Sindhudurg Crime : बांदा पोलिसांची असनीये येथे धडक कारवाई

गावठी बंदूक, ९ जिवंत काडतुसे जप्त
Pistol Arrest
Pistol Arrest File Photo
Published on
Updated on

बांदा : असनीये येथे बांदा पोलिसांनी गुरुवारी सकाळी धडक कारवाई करत गावठी बंदूक व नऊ जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी जयेंद्र अनिल सावंत (वय २७, रा. असनीये) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला ही बंदूक पुरविणाऱ्या मुख्य संशयितालाही पोलिसांनी अटक केली असून, त्याचे नाव तपासाच्या गोपनीयतेमुळे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

असनीये परिसरात एका व्यक्तीकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. ही माहिती बांदा पोलिसांना देण्यात आल्यानंतर सहा. निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी असनीये येथे कारवाई केली. या कारवाईत जयेंद्र सावंत याच्याकडून गावठी बनावटीची काडतूस बंदूक आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.पोलिसांनी जयेंद्रची प्राथमिक चौकशी केली असता, त्याला ही बंदूक पुरविणाऱ्या व्यक्तीची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित शस्त्र पुरवठादारालाही ताब्यात घेतले. या प्रकरणात बंदूक नेमकी कुठून आणण्यात आली, काडतुसे कोठून मिळविण्यात आली तसेच यापूर्वी या शस्त्र पुरवठादाराने अन्य कोणाला बंदुका अथवा काडतुसे पुरविली आहेत का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, अटक केलेल्या पुरवठादाराकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बांदा पोलिसांचे पथक गोवा हद्दीत पुढील तपासासाठी रवाना झाल्याची माहिती आहे. तसेच बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही संबंधित व्यक्तीने अन्य काही जणांना बंदुका पुरविल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल तसतसे बेकायदेशीर शस्त्र पुरवठ्याचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शस्त्रांच्या व्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. जप्त केलेली बंदूक व काडतुसे तसेच अटक केलेल्या संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पुढील तपासकार्य सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news