Bala Nandgaonkar| पिंगुळी तलाव प्रश्नी एसआयटी चौकशी करा!

मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी
Bala Nandgaonkar
मनसे नेते बाळा नांदगावकर
Published on: 
Updated on: 

कुडाळ : विकास हा झालाच पाहिजे; मात्र विकास होताना विनाश होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. दुर्दैवाने पिंगुळीतील पाझर तलावाच्या बाबतीत ही काळजी घेतलेली दिसत नाही. या तलावाच्या प्रश्नाची सासोली प्रकरणाप्रमाणेच विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करून सत्य बाहेर आणले पाहिजे, अशी ठाम मागणी मनसे नेते तथा माजी आ. बाळा नांदगावकर यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयाची दखल घेतली असून, येथील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्हाला पाठविले आहे. पाहणीचा अहवाल त्यांच्याकडे सादर केला जाणार असल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले.

पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठी गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रांत-तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला बाळा नांदगावकर, नेते शिरीष सावंत, सरचिटणीस संदीप दळवी यांनी भेट देऊन पाठींबा दिला.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, पं.स.सदस्य योगेश धुरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

नांदगावकर म्हणाले, पिंगुळीतील पाझर तलाव वाचला पाहिजे, ही ग्रामस्थांची भावना आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या या तलावाचे पाणी ग्रामस्थ वापरत आले आहेत. तलावावर शासनाचा अधिकार असला तरी स्थानिकांचाही तेवढाच अधिकार आहे. विकासाच्या नावाखाली तलाव परिसरात अतिक्रमण सुरू असून, भविष्यात त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. कोणताही विकास करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे आणि त्यांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे झाले नाही तर विरोध होणारच. लोकशाही जिवंत आहे की नाही, असा प्रश्न आज पडत आहे. ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या तलावाच्या रक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन सुरूच ठेवावे. यश निश्चित मिळेल. मनसेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस हे पक्षही ग्रामस्थांच्या सोबत आहेत.

मनसे नेते शिरीष सावंत म्हणाले, आपल्या हक्काच्या पाझर तलावाच्या रक्षणासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांनी अशीच एकजूट कायम ठेवावी. या लढ्याला यश मिळणारच असून, त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास आम्ही तयार आहोत. जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.