

दोडामार्ग ः बांबर्डे गावात दाखल झालेल्या ‘बाहुबली’ टस्कराने गुरुवारी रात्री गावातील शेतकरी तुकाराम गावडे यांच्या नारळ, सुपारी आणि केळीच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. अहोरात्र घाम गाळून, रक्ताचं पाणी करून उभी केलेली शेती या टस्कराने रात्रीत जमीनदोस्त केली. आयुष्याची पुंजी असलेली शेती डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने गावडे यांना अश्रू अनावर झाले.
मागील काही दिवसांपासून वीजघर, बांबर्डे परिसरात गणेश, ओंकार या टस्करांसह सहा हत्तींचा कळप वावरत आहे. दरम्यान गेले 5-6 महिने घटमाध्यावर आजरा, चंदगड परिसरात वावरणारा ‘बाहुबली’ टस्कर आठ दिवसांपूर्वी तिलारी खोऱ्यात आला आहे. बुधवारी रात्री तो उंबर्डे गावात दाखल झाला. त्याच्या गगनभेदी चित्कारांनी बांबर्डे गावाचा परिसर थरारून गेला. त्याचा चित्करा ऐकून सहा हत्तींच्या कळपाने जंगलात धूम ठोकली. तर ग्रामस्थांच्या मनात धडकी भरली. बाहुबलीचा या परिसरात वावर वाढला.गुरुवारी रात्री ‘बाहुबली’ टस्कर बांबर्डे येथील शेतकरी तुकाराम गावडे यांच्या फळबागायती घुसला. यानंतर ‘ बाहुबली’ ने बागायतीत अक्षरशः धुमाकूळ घातला.
नारळ आणि सुपारीची झाडे मुळासकट उन्मळून टाकली, तर केळीच्या झाडांचा फडशा पाडला. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभी राहिलेली शेती अवघ्या काही तासांत उद्ध्वस्त झाल्याचे भीषण दृश्य सकाळी समोर आले. ही शेतीच माझ्या कुटुंबाची उपजीविका होती. आता आम्ही जगायचं कसं? असा आक्रोश करत श्री गावडे यांनी आपली व्यथा मांडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नेहमीप्रमाणे पंचनामा करण्यात आला.