

सावंतवाडी ःअनुसूचित जाती व बौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून आज घडीला फक्त 4 कोटी रू. निधी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात मागासवर्गीयांच्या 540 वस्त्या असून या सर्व वस्त्यांमधून सुमारे 900 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. हा निधी पुरेसा नसल्याने आमचा समाज विकासापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे दलित समाजाच्या विकासासाठी या आर्थिक वर्षात 20 कोटी रु. निधी मंजूर करावा व तसे आदेश जिल्हाधिकारी व सहायक आयुक्त समाजकल्याण यांना द्यावेत, अशी मागणी जि. प. समाजकल्याणचे माजी सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी मस्त्योद्योग व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
ना. राणे यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय समाजाच्या सुमारे 540 वस्त्या आहेत. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. या समाजाच्या विकासासाठी दरवर्षी जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग यांच्याकडून निधी वर्ग दिला जातो. दरवर्षी हा निधी वाढता असतो .मात्र यावर्षी जिल्ह्यासाठी केवळ 4 कोटी रु.निधी प्राप्त झाला आहे.हा निधी पुरेसा नाही. यातून प्राप्त प्रस्ताव नुसार विकास कामे मंजूर करताना अडचणी होणार आहेत. परिणामी समाज विकासापासून वंचित राहणार आहे.गेल्या वर्षी हाच निधी 11 कोटी 78 लाख रू.एवढा मिळाला होता.मात्र यावर्षी निधी कमी प्राप्त झाला आहे.
जिल्हातील दलित जनतेचा विकास व्हावा यासाठी या आर्थिक वर्षात किमान 20 कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी निवेदनादद्वारे त्यांनी ना. राणे यांचेकडे केली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना द्यावेत असे नमूद केले आहे. यावेळी कणकवलीचे माजी नगरसेवक गौत्तम खुडकर,अजित तांबे,यशोधन सर्पे,सरपंच सुशील कदम,किरण जाधव,सुंदर जाधव,राजू जाधव आदी उपस्थित होते.