

कणकवली ः कासार्डे ग्रुप क्षेत्रातील महिला बचत गटांच्या बैठकीदरम्यान वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सातजणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकीय प्रचार केल्याच्या वादातून असलदे- शिवाजीनगर येथील महिला बचतगटाच्या बैठकीत जोरदार वाद होवून सीआरपी महिलेला मारहाण झाली होती. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वा. च्या सुमारास घडली होती.
या प्रकरणी बचत गटांच्या सीपीआर ( समुदाय संसाधन व्यक्ती) सुषमा सुरेश सावंत ( 47, रा. बावशी धनगरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मनश्री कांडर, दिव्या कांडर, प्रभावती मर्ये, दशरथ मर्ये, दिपक कांडर, निलेश साळसकर ( सर्व रा. बावशी- गावठणवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुषमा सावंत यांच्या म्हणण्यानुसार कासार्डे ग्रुप क्षेत्रातील महिला बचतगटांची आढावा बैठक सुरू असताना संशयित आरोपींनी, त्या राजकारण करतात, आपल्या विरोधात तक्रारी करतात अशी विचारणा करत शिवीगाळ केली तसेच हाताच्या थापटाने मारहाण केली. यावेळी त्यांचा मुलगा अनिकेत हा सोडविण्यास आला असता त्यालाही शिवीगाळ करून झटापट करण्यात आली असे फिर्यादीत सुषमा सावंत यांनी म्हटले आहे.
तर अनिकेत सुरेश सावंत (29,रा. बावशी धनगरवाडी) याच्या विरूध्द महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे करीत आहेत.