

कणकवली ः असलदे गावात सरस्वती हायस्कूलच्या पाठीमागील भागात एक बिबट्या मादी व दोन पिल्ले असे तीन बिबटे वावरत आहेत. या ठिकाणी शाळेतील मुले असतात. तसेच असलदे-धनगरवाडी नदीकिनारी असलेला भाग व गावठण-दिवानसानेवाडी भागात या बिबट्यांचा वावर आहे. या बिबट मादीसह त्यांच्या पिल्लांना सापळा लावून पकडावे, अशी मागणी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याकडे सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केली आहे.
दरम्यान, देवगड-निपाणी मार्गालगत शेतकरी गोविंद पारकर यांच्या गायीच्या वासराला बिबट मादीने ठार मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. तसेच असलदे -गावठणवाडी येथील दोन वासरांना बिबट्याने गेल्या 2 महिन्यांत ठार केले आहे. त्याठिकाणी बिबट्याच्या मादीचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या बरोबरच उगवतीवाडी, मधलीवाडी, डामरेवाडी या भागातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना या बिबट मादीचा वावर निदर्शनास येत आहे. असलदे-ओझर येथील जंगलात आर्सिया काझी यांच्या शेळ्यांच्या कळपावर चार दिवसांपूर्वी मादी बिबट्याने हल्ला केला. या संदर्भात सातत्याने वनविभागाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत आहे. हे बिबटे शेतकरी व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करण्यापूर्वी वन विभागाने तातडीने सापळा लावत त्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा असलदे गावातील शेतकऱ्यांच्या वतीने सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी दिला आहे.