Sindhudurg News| सिंधुदुर्गात शनिवारपासून वार्षिक जत्रोत्सवांना प्रारंभ

आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला जत्रोत्सव
Sindhudurg News
सिंधुदुर्गात शनिवारपासून वार्षिक जत्रोत्सवांना प्रारंभ
Published on: 
Updated on: 

कुडाळ : दिवाळीची सांगता होताच तळकोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. कुडाळ तालुक्यातील आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात होणारा 'दहीकाला' अर्थात जत्रोत्सव हंगामाच्या शुभारंभाची यात्रा असते. कार्तिक प्रबोधिनी एकादशी दिनी हा जत्रोत्सव होतो.

यावर्षी शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक, ओटीचा भरणे व रात्री दशावतारी नाटक होणार आहे. श्री देव नारायण मंदिराशेजारी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर असून कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. स. ८ वा. श्रींच्या मूर्तीवर अभिषेक होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. स. १० वा. पायी दिंडी, सायं.५ वा. हरिपाठ, रात्री ११.३० वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री १२.३० वा. खानोलकर दशावतार कंपनीचे दशावतारी नाटक (दहीकाला) सादर होणार आहे.

जत्रोत्सव हंगामातील ही पहिलीच जत्रा असल्याने आवळेगांव दशक्रोशीसह जिल्ह्यातील भाविक आणि दशावतारी नाटकांचे हौशी आवर्जून या जत्रोत्सवास हजेरी लावतात. या निमित्त आवळेगावातील सर्व घरे सडा रांगोळ्यांनी सजविली जातात. जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाहांना प्रारंभ होत असल्याने उसांच्या वाडांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मुंबई, पुणे परदेशात येथे नोकरीनिमित्त असलेले आवळेगाववासी चाकरमानी या यात्रेला आवर्जून उपस्थिती दर्शवितात. या जत्रोत्सवापासून जिल्ह्यातील गावोगावच्या जत्रोत्सवांना सुरुवात होते. याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मानकरी, देवस्थान कमिटी व आवळेगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.