Sindhudurg News| अणाव शिकार प्रकरण: तीन शेतकरी वनविभागाच्या रडारवर!

संशयित शेतकऱ्यांच्या चौकशीतून 'गूढ' उकलणार?
Anav Wildlife Death
अणाव शिकार प्रकरण
Published on
Updated on

कुडाळ : अणाव येथील जंगल परिसरात जमिनीखाली पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या त्या मृत प्राण्याने वनविभागाची झोप उडवली आहे. हा प्रकार नैसर्गिक मृत्यू नसून शिकारीचा असावा, असा दाट संशय आता यंत्रणेला सतावू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी आपली चक्रे फिरवली असून, परिसरातील तीन संशयित शेतकऱ्यांना वनविभागाने नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

​दोन महिन्यांपूर्वीची घटना; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

​प्राथमिक तपासात ही घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या पावसामुळे घटनास्थळावरील माती आणि खुणा पुसल्या गेल्या आहेत. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळापासून दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला, मात्र पावसामुळे ठोस भौतिक पुरावे शोधण्यात अडचणी येत आहेत. असे असले तरी, प्राण्याला जमिनीखाली गाडणे हीच बाब शिकारीच्या संशयाला बळकटी देणारी ठरली आहे.

शेतकरी रडारवर; बंदूकधाऱ्यांची यादी तयार

​वनविभागाने तपासाचा रोख आता स्थानिक शेतांच्या मालकांकडे वळवला आहे. ज्या भागात हा प्राणी आढळला, त्या परिसरातील तीन शेतकऱ्यांवर संशय व्यक्त करत त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते.या शेतकऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असून, त्यांच्या जबाबातून शिकारीचे 'गूढ' उकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.​

दुसरीकडे, पोलिसांनी स्थानिक पातळीवर बंदूक परवाना असणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. बेकायदेशीर शिकार झाली असल्यास वापरण्यात आलेले हत्यार कोणाचे होते, याचा शोध आता घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कडावल वनविभागाचे पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. आता त्या तीन शेतकऱ्यांच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण कुडाळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news