Sindhudurg News : अणावमध्ये गव्‍याची शिकार की नैसर्गिक मृत्यू..?

'त्या' मृत प्राण्यामुळे वनविभागाची झोप उडाली; बंदूकधाऱ्यांची यादी तयार करण्याच्या हालचाली
Indian Bison
गवारेडाPudhari File Photo
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कडावल रेंज अंतर्गत येणाऱ्या अणाव येथील जंगल आणि फॉरेस्ट बाउंड्रीवर एका घरापासून हाकेच्या अंतरावर जमिनीत पुरलेल्या अवस्थेत एक मृत प्राणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्राणी पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असला तरी, त्याच्या शिंगांवरून तो 'रेडा' असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकारामुळे शिकार झाली की नैसर्गिक मृत्यू, याबाबत गूढ वाढले असून वनविभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

अणाव येथील एका घरापासून साधारण ४०० ते ५०० मीटर अंतरावर हा मृत प्राणी जमिनीत गाडलेल्या स्थितीत सापडला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण जात आहे. मात्र, प्राथमिक पाहणीत तो गवारेडा असल्याचे निष्पन्‍न झाले आहे. विशेष म्हणजे, तो प्राणी जमिनीत पुरलेला आढळल्याने 'शिकारीचा' संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्थानिक पातळीवर बंदूक परवाना असणाऱ्यांच्या नावांची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते.

मंगळवारी या घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच आणि पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मृत प्राण्याचे नमुने ताब्यात घेऊन ते फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि प्राण्याची ओळख स्पष्ट होणार आहे. पंचनाम्यानंतर मृत प्राण्याचे अवशेष नियमानुसार दहन करण्यात आले.

जिल्हा उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. शिकारीचा प्रकार असल्यास त्यामागे कोणाचे धागेदोरे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. जंगल पट्ट्यात अशाप्रकारे प्राणी पुरलेला आढळल्याने वन्यजीव प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news