

कुडाळ : चिपी-सिंधुदुर्ग विमानतळाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत शुक्रवारी रात्री खासगी चार्टर्ड विमानाने पहिले आयएफआर (Instrument Flight Rules) रात्रीचे उड्डाण यशस्वीरित्या केले. रात्री 8 वाजता हे विमान चिपी विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले. यामुळे सिंधुदुर्ग विमानतळावर पहिल्या आयएफआर (IFR) नाईट फ्लाईटची नोंद झाली आहे.
अलीकडेच चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी टेकऑफ किंवा लँडिंग कधी होणार, याची उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी रात्री चार्टर्ड विमानाने उड्डाण करत ही प्रतीक्षा संपवली. या यशस्वी उड्डाणामुळे विमानतळाची तांत्रिक क्षमता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सिद्ध झाली असून प्रादेशिक विमानसेवेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यानंतरचे हे पहिलेच आयएफआर (IFR) उड्डाण असल्याने विमानतळ प्रशासन, तांत्रिक कर्मचारी आणि स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या उड्डाणामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिक विमानसेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पर्यटन, उद्योग, व्यापार अन् आपत्कालीन सेवाना होणार फायदा
दरम्यान, चिपी विमानतळावरून आता रात्रीही विमान उड्डाणे सुरू होतील, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. यासाठी भाजप खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने नाईट लँडिंग सुविधेला मंजुरी दिल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या पार्श्वभूमीवर आता मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमानसेवा कधी सुरू होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. पर्यटन, उद्योग, व्यापार तसेच आपत्कालीन सेवांसाठी रात्रीच्या विमानसेवेचा मोठा फायदा होणार असून चिपी विमानतळाच्या विकासाला यामुळे नवे बळ मिळणार आहे.