

आचरा : आचरा प्रा. आ. केंद्र येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. कपील मेस्त्री हे मनमानी कारभार करत आहेत. रुग्णांशी उद्धट वागणे, चुकीचे उपचार सांगणे तसेच महिला आरोग्य कर्मचार्यांना मानसिक त्रास देत असल्याची तक्रार आचरा ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती. यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी बुधवारी आचरा आरोग्य केंद्रात आले असता उपस्थित रुग्ण, ग्रामस्थ तसेच आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य कर्मचार्यांनी डॉ.मेस्त्री यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचला. संतप्त ग्रामस्थांनी चौकशीसाठी आलेले जिल्हा अति.आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांना चार तास घेराव घालत कारवाईची मागणी लावून धरली.
अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री यांची आचरा येथून तत्काळ बदली करण्याचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढल्यानंतर ग्रामस्थांनी घेराव मागे घेतला. येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. अति.आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्यासमवेत मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, आचरा प्रा. आ. केंद्राच्या डॉ.जुवेरिया मुजावर उपस्थित होत्या. तर ग्रामस्थांमधून शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रा. पं. सदस्य पंकज आचरेकर, मुजफ्फर मुजावर, माजी सरपंच डॉ. प्रमोद कोळंबकर, अभय भोसले, जयप्रकाश परूळेकर, राजन पांगे, अभिजित सावंत, बाबू कदम, उदय घाडी, मंगेश मेस्त्री, कपिल गुरव, पोलीस पाटील विठ्ठल धुरी,रवींद्र मुणगेकर, गुरु कांबळी व ग्रामस्थ उपस्थित होत.
डॉ. कपिल मेस्त्री यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचण्यासाठी काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक आरोग्य केंद्रात दाखल झाले होते. यावेळी आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल महिलेने प्रसूती दरम्यान हेळसांड झाल्याने आपल्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची तक्रार केली. ती महिला म्हणाली, आपण गरीब असून प्रसुतीसाठी आचरा प्रा. आ. केंद्रात दाखल झाले होते. आपल्याकडे पैसे नसतानाही प्रसुतीसाठी लागणारे सामान बाहेरून विकत अणण्यास सांगण्यात आले. प्रसुती वेदना होत असल्याने माझ्या पतीने अधिक उपचारासाठी पुढे जाण्यासाठी विचारले असता वैद्यकीय अधिकार्यांनी उद्धट उत्तरे देऊन मज्जाव केला.
दरम्यान, माझ्या पतीने माझी स्थिती बघून मला कणकवलीला नेले. मात्र यात वेळ निघून गेल्याने माझ्या पोटातच बाळ दगावले, असे सांगत त्या महिलेला अश्रू अनावर झाले. माझ्या बाळाच्या मृत्यूला आचरा येथील वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप तिने केला. यावेळी हजर रुग्णांनीही वैद्यकीय अधिकार्यांच्या बेजबाबदार पणाचा पाढा वाचला. तपासणीसाठी आलेल्या एका ज्येष्ठ रुग्णाला किडन्या फेल झाल्याचे तपासणी न करता सांगितले. धक्का बसलेल्या त्या जेष्ठने खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता कोणताही आजार नसल्याचे निष्पन्न झाल्याचे उपस्थित त्या जेष्ठाने सांगत संताप व्यक्त केला. कावीळ झालेल्या रुग्णाला 8 दिवस कोणत्याही उपचाराविना ठेवल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी प्रा. आ. केंद्राच्या महिला कर्मचार्यांनीही डॉ. मेस्त्री यांच्याबाबत तक्रारी केल्या. डॉ. मेस्त्री ड्युटीवर असताना आम्हाला मानसिक त्रास देत असल्याचे या महिला कर्मचार्यांनी सांगितले. कार्यालयीन भाषेचा वापर न करता अरे तुरे करणे, महिला कर्मचार्यांना एकेरी बोलणे, कर्मचार्यांना रुग्णांसमक्ष व इतर सहकर्मचार्यांसमक्ष अपमानास्पद वागणूक देणे, अश्या काही तक्रारी या महिला कर्मचार्यांनी केल्या.
आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस हे उपस्थित नसताना आरोग्य केंद्रात रुग्णाच्या समोर वैद्यकीय अधिकारी त्यांना शिवीगाळ करायचे, अशी तक्रार काही ग्रामस्थांनी करताच सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले. गावच्या प्रथम नागरिकास अपशब्द बोलणारे अधिकारी, डॉक्टर आमच्या गावात नकोच, अशी भूमिका घेतली.
उपस्थित ग्रामस्थांनी चौकशीसाठी आलेले अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांचाकडे आपण वरिष्ठाकडे कारवाईसाठी कोणता अहवाल पाठविणार याची तत्काळ प्रत द्यावी, अशी मागणी केली. यावेळी डॉ. कांबळे यांनी कारवाई बाबतचा वरिष्ठांना पाठविण्याचा अहवाल, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आचरा वैद्यकीय अधिकारी यांना आचरा आरोग्य केंद्रातून तत्काळ हटवत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात उपस्थित राहाण्याचे आदेश दिल्याचे पत्र ग्रामस्थांना दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी येत्या दोन दिवसात उचित कारवाई करा, कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.