

आचरा : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ‘कसबा आचरे चौघड्यावरच्या गणपती’ अर्थात आचऱ्याच्या विघ्नहर्त्या गणरायाला शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. तब्बल ४१ दिवस मनोभावे सेवा केलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मावळत्या सूर्याच्या साक्षीने आचरा समुद्रकिनारी झालेली महाआरती आणि त्यानंतर पार पडलेले विसर्जन हा सोहळा उपस्थितांच्या मनावर भक्तीचा अमिट ठसा उमटवून गेला.
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या शाही गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता श्रींचे उत्तरपूजन करण्यात आले. आचरा देऊळवाडी आणि मेस्त्रीवाडी येथील ग्रामस्थांनी श्रींची आरती केली. त्यानंतर दुपारी १ वाजता तोफेच्या सलामीने आणि ‘श्री गजानन महाराज की जय’च्या जयघोषात शाही विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
देव रामेश्वर मंदिरातून निघालेल्या या मिरवणुकीत आचरा गावातील बँजो पथक,कोल्हापूर येथून भैरव नाथ लेजीम पथक सहभागी झाले होते. आकर्षक पुष्पसजावट केलेल्या भव्य रथातून श्रींची मूर्ती मार्गस्थ झाली. मंदिरापासून आचरा तिठा, बाजारपेठ, भंडारवाडी, काझीवाडा, गाऊडवाडी आणि आचरा बंदरमार्गे मिरवणूक पुढे सरकत पिरावाडी येथील देव चव्हाट्यावर दाखल झाली. ठिकठिकाणी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.पिरावाडी येथील देव चव्हाट्यावर काही काळ श्रींची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांसह परिसरातील भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना शीतपेये, लाडू आणि मोदकांचा प्रसाद वाटप करण्यात आला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनही समुद्रकिनारी पाणी वाटप करण्यात आले. त्यानंतर विसर्जन मिरवणूक समुद्रकिनारी दाखल झाली. लाटांचा निनाद, मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री गणेशाची महाआरती करण्यात आली.
दशक्रोशीसह मुंबईकरांचीही उपस्थिती!
सुमारे सहा तास चाललेल्या या भव्य विसर्जन मिरवणुकीत आचरा दशक्रोशीतील ग्रामस्थांसह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोवा येथून आलेले गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आचऱ्याच्या पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात हिंदू बांधवांसोबत गावातील मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांनीही सहभाग घेतला. सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही मिरवणूक सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरली.