

आंबोली : आंबोली घाटात नाना पाणी नजीक वळणावर आयशर ट्रकने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत निकिता प्रसाद राऊत (वय 11, रा. फौजदारवाडी, आंबोली) ही बालिका जागीच ठार झाली, तर निकिताची आई सुचिता राऊत या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघातस्थळापासून काही अंतरावरच तो रस्त्यावर उलटला. त्यामुळे तब्बल अडीच ते तीन तास घाटमार्गातील वाहतूक ठप्प झाली. ही घटना रविवारी सकाळी 10.45 वा. च्या सुमारास घडली.
आंबोली-फौजदारवाडी येथील प्रसाद राऊत हे पत्नी सुचिता व मुलगी निकिता यांच्यासह बावळाट गावी दुचाकी निघाले होते. प्रवासात आंबोली घाटात गुजरात ते गोवा जाणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील निकिताचे डोके रस्त्यावर जोरदार आदळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई सुचिता गंभीर जखमी झाली. प्रसाद राऊत यांनाही किरकोळ मार लागला.
अपघातानंतर ट्रक चालक प्रकाश बिजलभाई (26) व क्लिनर विशाल टोयटा (24, दोघेही रा. रोहिशाळा, राजकोट-गुजरात) यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे काही अंतरावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक हा घाटमार्गातच पलटी झाला होता. त्यामुळे ट्रकमधील फरशा रस्त्यावर विखुरल्याने घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
मृत निकिताचा मृतदेह तसेच जखमी आईला सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. मृत निकिता हिच्या पश्चात आई-वडील, बहीण, काका असा परिवार आहे. निकिताही पत्रकार विजय राऊत यांची पुतणी होय. दरम्यान, या अपघातानंतर आंबोली ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली होती; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ग्रामस्थ शांत झाले.