

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-टेंबधुरीनगर येथे दोन दुचाकीत झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार प्रदीप ऊर्फ मनीष दीपक पेडणेकर (24, सध्या रा. वेताळ बांबर्डे, आंगणेवाडी, मूळ रा. वालावल, ता. कुडाळ) याचे निधन झाले. तर दुसरा दुचाकीस्वार अमित दिलीप जोशी (रा. बिबवणे) किरकोळ जखमी झाला. हा अपघात शनिवारी दु. 1.15 वा.च्या सुमारास झाला. प्रदीप हा शनिवारी सकाळी वेताळबांबर्डे येथे क्रिकेट खेळण्यासाठी आला होता. तो एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून कार्यरत होता.
याबाबत अमित जोशी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. श्री. जोशी दुचाकी घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून बिबवणे ते कुडाळ येत होते. पिंगुळी - धुरीटेंबनगर (साई मंदिर नजीक) येथे पेट्रोल पंपावर वळण्यासाठी त्यांनी डाव्या हाताचा इशारा करून दुचाकी ते वळवित असताना त्यांच्या पाठीमागून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या हिरो पॅशन दुचाकीने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात हिरो पॅशनचा दुचाकीस्वार प्रदीप पेडणेकर रस्त्यावर फेकला जाऊन काही अंतर फरफटत गेला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्याला त्याचे डोके आदळले. यात त्याच्या डोक्यात मोठा रक्तस्राव झाला. ग्रामस्थांनी त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र, काहीवेळातच त्याचे निधन झाले. यात अमित जोशी यांना किरकोळ दुखापत झाली. घटना समजताच वेताळबांबर्डे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात दोन्ही दुचाकीचे नुकसान झाले. घटनेची माहीती मिळताच कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. अधिक तपास उपनिरीक्षक ममता जाधव करीत आहेत.
प्रदीप पेडणेकर हा एक खासगी कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत होता. तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. तो वेताळबांबर्डेत आजोळी राहायचा. त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.