

कुडाळ : कुडाळ-मालवण मार्गावर कल्पना अपार्टमेंट समोर सोमवारी सकाळी सुमारे ११.१० वाजता झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात स्कुटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रसत्त स्कुटीला ठोकर बसून एक दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाला आहे. तर या अपघात प्रकरणी ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५, रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याच्यावर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नेरूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुडाळ पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर हा नेरूर येथून कुडाळच्या दिशेने जात होता. यावेळी हा ट्रक कल्पना अपार्टमेंट समोर आल्यावर चालकाने अचानक व धोकादायकरीत्या आपल्या ट्रकचा वेग कमी केला. यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या स्कुटी वरील निलम निलेश मेस्त्री (वय ३५, रा. नेरूर साईटेंब, ता. कुडाळ) यांनी अचानक ब्रेक लावला. त्यात त्या ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर स्कुटी रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलला धडकली. या मोटारसायकलवरील स्वार मुकुंद नितीन मार्गी (वय २४, रा. रोयुडीयेवाडी, नेरर तर्फ हवेली देऊळवाडा, ता. कुडाळ) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हातास व कंबरेला दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५, रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, कुडाळ येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी जखमी मोटारसायकलस्वार मुकुंद मार्गी यांनी ट्रकचालकाविरोधात तक्रार दिली असून पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत.