सिंधुदुर्गः शेवटचा पेपर सोडविण्याआधीच दहावीतील विद्यार्थिनीवर काळाचा घाला!

Sindhudurg Accident News | डंपर मोटरसायकल अपघातात मुलगी जागीच ठार, कुडाळ तालुक्‍यातील पाट येथे अपघात
Sindhudurg Accident News
डंपर - मोटरसायकलचा झालेला अपघातात Pudhari Photo
Published on
Updated on

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

     कुडाळ तालुक्यातील पाट तिठा येथील श्री माऊली मंदिरानजिक येथे डंपर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाट हायस्कूलची दहावीतील विद्यार्थीनी ठार झाली. मनस्वी सुरेश मेतर (वय 16, रा.निवती मेढा, ता.वेंगुर्ले) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मोटारसायकल धडकून मनस्‍वी डंपर खाली सापडल्‍याने तिचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर मोटारसायकल चालक जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी 6.40 वाजताच्या सुमारास घडली.

मनस्वी उद्या सोमवारी दहावीचा शेवटचा पेपर देणार होती. परंतू त्या आधीच ती क्लास साठी मोटारसायकलच्या मागे बसून जात असताना तिच्यावर काळाने घाला घातला. तिच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने पाट - निवती पंचक्रोशी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी निवती पोलीस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर अल्पवयीन मोटारसायकलस्वार त्याचे वडील व डंपर चालक अशा तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती निवती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याबाबतची खबर योगेश उल्हास मेतर (रा.निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली आहे.

      वनविभागातील अधिकारी सुरेश मेतर यांची मुलगी मनस्वी ही एस.एल.देसाई विद्यालय, पाट या हायस्कूल मध्ये दहावी इयत्तेत शिकत होती. ती नेहमी एसटी बसने शाळेत जात असे. सध्या दहावीचा परीक्षा चालू असून, उद्या सोमवारी दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर होता. ती हायस्कूल मध्ये क्लास साठी जात होती. हुमरमळा येथील तिच्या ओळखीतील मुलग्याने तिला म्हापण येथे आपल्या मोटारसायकलवरुन डबलसीट बसवून दोघेही व्हाया पाट तिठा येथून कुंभारवाडी मार्गे पाट हायस्कूल घेऊन जात होता. त्याचवेळेस परूळेहून कुडाळच्या दिशेने बेदरकारपणे जाणा-या वाळू वाहतूक करणा-या डंपरला मोटारसायकलने जोराची धडक दिली. यात मोटरसायकल रस्त्यावर पडून, मोटारसायकलस्वार व मागे बसलेली मनस्वी दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात मनस्वी ही डंपरच्या मागील चाकाखाली गेली. त्यांना वाचविण्यासाठी डंपर चालकाने शर्थीचे प्रयत्न केले पण चाक तिच्या अंगावरुन गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप शेटये, सुनील सावंत व विक्रांत लोणे यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

    जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान निवती व पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच बेदरकार डंपर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी लावून ठरली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा.निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघातप्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर (रा.हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

सोमवारी हाेता शेवटचा पेपर !

   मनस्वी उद्या सोमवारी दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर देणार होती. ती अभ्यासात हुशार होती. मात्र शेवटचा पेपर सोडविण्याआधीच तिचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने मेतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहीती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईक, शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिच्या निधनाने पाट-म्हापण-निवती पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news