

कुडाळ ः कुडाळ शहरातील गांधी चौक येथील सिद्धिविनायक सोडा पब कोल्ड्रिंक हाऊस समोर घडलेल्या दोन गटांतील मारामारी प्रकरणी दोन्ही गटातील एकूण चार महिलांसह दहा जणांवर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गांधी चौक येथे मंगळवारी सायंकाळी 4.45 वा. घडली. यामध्ये दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कुडाळ पोलीस स्थानकात जमाव आक्रमक झाला होता. अति. पोलिस अधीक्षक कृषीकेष रावले यांनी जमावाला शांत होण्याचे आवाहन करूनही माफीनामा व विनयभंग गुन्हा मागे घेण्याची मागणी आक्रमक महिला व जमावाने करत पोलीस स्थानकात शिरण्याचा प्रयत्न केला होता.
यातील तक्रारदार जयराम विष्णू गडेकर (43, रा.कवीलकाटे-मधलीवाडी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी आपल्या कोल्ड्रिंक हाऊसच्या दुकाना समोर आपली दुचाकी लावलेली होती. त्यांची दुचाकी गाडी विरोधकांच्या इनोव्हा गाडीचला घासल्याने ती खाली पडली. याबाबत अज्ञात इनोव्हा कार चालकाला विचारणा केली म्हणून इनोव्हा कार चालक तसेच कारमधील इतर अज्ञात चार महिलांना त्याचा राग आला व त्यांनी कारमधून उतरून आपल्याला शिवीगाळी केली. तसेच हाताच्या थापटाने व चपलांनी बेदम मारहाण केली. तसेच श्री. गडेकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून श्री.गडेकर यांचे नुकसान केले अशी फिर्याद दिली आहे. यानुसार एक पुरुष व चार अनोळखी महिलांवर कुडाळ पोलीसात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 115(2), 189(2), 324 (4), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कर्हाडकर करत आहेत. तक्रारदार जयराम गडेकर हे या महिलांना ओळखत नसल्याने त्याची तक्रारीत नावे नमूद करण्यात आली नाही. मात्र तपासात ही नावे निष्पन्न करून त्यांची नोंद तक्रारीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
सदर महिला व पुरुष मुंबईतील असून एका मोठ्या राजकीय लोकप्रतिनिधीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. यानंतर कुडाळ पोलीसात मुंबईस्थित एका मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी पाच पुरूषांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 24 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना 4. 45 वा. सिद्धिविनायक सोडा पब कोल्ड्रिंक हाऊस समोर घडली. तिचे काका अमित शेलार यांच्या इनोव्हा गाडीचा धक्का लागून दुचाकी खाली पडली म्हणून सुमारे पाच संशयितांनी फिर्यादीचे काका, बहिण व मावशी यांना धक्काबुक्की केली तसेच फिर्यादीच्या बहिणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले . तसेच लाथांनी मारले व फिर्यादी यांच्या मावशीच्या डोक्यावर हाताने मारून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत शिवीगाळी केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक श्री. शेगडे हे तपास करत आहेत. यातील तक्रारदार मुलगी ही या पाच अनोळखी पुरूषांना ओळखत नसल्याने त्याची तक्रारीत नावे नमूद करण्यात आली नाही. मात्र तपासात ही नावे निष्पन्न करून त्यांची नोंद तक्रारीत करण्यात येणार आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.