

दोडामार्ग : पोलिस होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सोनावल येथील शुभम डेगवेकर (२१) याचे स्वप्न एका क्षणात काळाने हिरावून घेतले. चंदगड तालुक्यातील वाळकोली येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात शुभमचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सोनावल गावासह परिसरावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुभम डेगवेकर हा शनिवारी दुचाकीवरून चंदगड तालुक्यात गेला होता. वाळकोली फाट्याजवळ समोरील टेम्पोला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, शुभमचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. चंदगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शुभम हा पोलिस भरतीची तयारी करत होता. खाकी वर्दी परिधान करून समाजसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो कुडाळ येथील एका प्रशिक्षण केंद्रात भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता. मात्र, नियतीने घात केला आणि त्याचे हे स्वप्न कायमचे अधुरे राहिले. शुभमच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे.