

मालवण : जय भवानी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणा देत मुसळधार कोसळणार्या पावसाची तमा न बाळगता दुर्गसंवर्धन चळवळीचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या पंधरा शिलेदारांनी मालवण बंदर जेटीवरील कस्टम कार्यालय आवारात वर्षोनुवर्षे जमिनीखाली अर्धवट उलटी गाडलेल्या शिवकालीन तोफेला मोकळा श्वास दिला.
मालवण बंदर जेटीवर कस्टम ऑफिस प्रांगणात कित्येक वर्षे एक शिवकालीन तोफ जमिनीत उलटी करून अर्धवट गाडलेल्या अवस्थेत होती. सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि इतिहास अभ्यासक गणेश रघुवीर हे 2019 साली मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गला आले होते. त्यावेळी उलट्या अवस्थेत जमिनीत गाडली गेलेली शिवकालीन तोफ त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांच्या कानी ही गोष्ट घातल्यानंतर या तोफेला जमिनीतून बाहेर काढण्याचे ठरले आणि 2019 साल पासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्गने हालचाली सुरू करून कस्टम खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधत पत्रव्यवहार सुरु केला. अखेर या प्रयत्नांना यश आल्याने 23 मे रोजी ही तोफ बाहेर काढण्याचे ठरले.
सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष रामचंद्र आईर, तसेच शिलेदार एकनाथ गुरव, कार्तिक गोसावी, साहिल आईर, ओमप्रकाश नाईक, मंदार सावंत, बंटी आईर, अश्विन गाड, दिनेश आंगणे, प्रज्वल कोयंडे, मनीष गावडे, यशराज कोयंडे, ओजस परब, उमेश खडपकर, गजानन दळवी यांनी सुमारे आठ तास खोदाई करत जमिनीत अर्धवट अवस्थेतील ही तोफ बाहेर काढली.
ही तोफ सर्वांसमोर यावी, तोफेचे योग्य संवर्धन व्हावे या हेतूने दुर्ग संवर्धनाचे कार्य करणार्या सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेकडून तोफ कठडा व जमिनीतून बाहेर काढली. यासाठी कस्टम विभाग मालवण आणि मेरीटाईम बोर्ड यांचे सहकार्य लाभले. ही तोफ ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग अथवा किल्ले राजकोट याठिकाणी ठेवून तीचे संवर्धन करण्यात येणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने यापूर्वी दोडामार्ग -फुकेरी येथील हनुमंतगड परिसरातील दरीत सापडलेल्या तोफांचे देखील संवर्धन केले आहे.
या तोफेचा इतिहास रंजक आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्गने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतर सुद्धा तोफांनी भरपुर मोलाची भुमिका बजावली होती. इंग्रज आणि करवीर सरकार यांच्यात 1 ऑक्टोबर 1812 तह झाला. या तहानुसार गलबते, सरंजाम, तोफा व दारूगोळा सरकार कोठिचा दाणा व भांडी इत्यादी महाराजांकडे राहील. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील तोफा काढायचे 1812 ला ठरले परंतु तोफा, गलबते, सरंजाम हलवण्यास करवीर करांना 12 वर्ष लागली. यामधल्या वेळात काही तोफा सिंधुदुर्ग किल्ला जेटीवर पण आढळून आल्या आहेत. तसेच एक तोफ कस्टम ऑफीस गेट शेजारील भिंतीत उभी ठेवलेली होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे.