

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील प्रमुख राज्यमार्गांची अक्षरशः चाळण झाली असून, गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे न बुजवल्यास त्यांत थेट वृक्षारोपण करण्याचा अनोखा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आहे. या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फोंडा-वैभववाडी-उंबर्डे आणि उंबर्डे-भुईबावडा या महत्त्वाच्या मार्गांवर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, 2020-21 मध्येच या रस्त्यांचे नूतनीकरण झाले होते. मात्र, दोन वर्षांतच रस्त्यांची झालेली दुरवस्था वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मंगेश लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन हा इशारा दिला आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य : लोरे नं. 1 ते वैभववाडी बाजारपेठ, संभाजी चौक आणि कुसुर ते भुईबावडा दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
अपघातांना निमंत्रण : खड्डे चुकवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, गंभीर अपघातांचा धोका वाढला आहे.
गणेशोत्सवाची चिंता : सणासुदीच्या काळात वाढणार्या वाहतुकीमुळे गैरसोय आणि अपघातांची शक्यता अधिक आहे.
तत्काळ उपाययोजना : येत्या 15 दिवसांत हे खड्डे पावसाळी डांबर किंवा सिमेंट काँक्रीटने बुजवण्यात यावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.