

देवगड ः देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘गडकिल्ले दर्शन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा. जामसंडे येथील जि. प. आदर्श शाळा नं. 1 या शाळेतील विद्यार्थ्यांना विजयदुर्ग किल्ला दर्शन घडविण्यात येणार आहे. तेथे स्थानिक शिवप्रेमींच्या उपस्थितीत विजयदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच 18 फेब्रुवारी रोजी स.9.30 वा. बर्वे लायब्ररी सभागृहात तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत साटम यांनी शिवजयंती उत्सवाची माहिती दिली. मराठा समाजाचे बंटी कदम, किसन सूर्यवंशी, अविनाश सावंत, केदार सावंत, तुषार पाळेकर, दयानंद पाटील, शंकर पाटील आदी उपस्थित होते. साटम म्हणाले, शिवजयंती उत्सव सर्वसमावेश असावा, अशी मराठा समाजाची भावना आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी प्रथमच 18 रोजी सकाळी 9.30 वा. उमाबाई बर्वे लायब्ररी सभागृह येथे देवगड तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा एकेरी गटात होणार आहे. यातील प्रथम क्रमांक 5 हजार रू. व चषक, द्वितीय 3 हजार रू. व चषक, तृतीय 2 हजार रू. व चषक देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी प्रकाश प्रभू यांच्याशी संपर्क साधावा. तसेच 19 रोजी शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ले दर्शन हा अभिनव उपक्रम यावर्षीपासून राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जामसंडे शाळा नं. 1 च्या विद्यार्थ्यांना विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन घडविण्यात येणार आहे. विजयदुर्ग येथे शिवजयंतीनिमित्त ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना विजयदुर्ग किल्ल्याची माहिती देऊन शिवप्रेमींच्या वतीने किल्ल्यावरच शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन साटम यांनी केले आहे.