विधानसभेत गद्दारांना त्यांची जागा दाखवा!

ठाकरे शिवसेना नेत्या शीतल देवरुखकर यांची टीका
Shital Devarukhkar
शीतल देवरुखकर
Published on
Updated on

सावंतवाडी : ज्यांना उद्धव ठाकरेंनी मोठे केले, मानसन्मान दिला, मंत्रिपदे दिली तो त्यांना राखता आला नाही. त्यामुळे असे लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील कामांशी व दिलेल्या आश्वासनांशी काय निष्ठावंत राहतील.कोकणात साधी भोळी लोक राहतात, मात्र वेळ आली की गद्दारांनाही ते धूळही चारु शकतात एवढी ताकद महिला शक्तीमध्ये आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला अशा गद्दारांना धूळ चारुन त्यांना त्यांची जागा दाखवा,अशी टीका ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या व मुंबई अधिसभा सदस्य सौ. शीतल देवरुखकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली. तर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतात; मात्र यांच्या राज्यात बहिणी सुरक्षित आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

सावंतवाडी येथील बॅ.नाथ पै सभागृहात ठाकरे शिवसेना गटातर्फे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवानिमित्त ‘जागर नवशक्तीचा, खेळ फुगडीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख सुकन्या नरसुले, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत, अतुल रावराणे, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा, महिला तालुका संघटक श्रुतिका दळवी,रश्मी माळवदे, अ‍ॅड.निता गावडे, भारती कासार, समिरा शेख, उपजिल्हा संघटक विनिता घाडी, मारिया डिमेलो, रमेश गावकर, संदीप गवस, संदीप माळकर, सुनील गावडे, शिवदत्त घोगळे, आबा सावंत, अशोक परब, उल्हास परब, विश्राम कांबळे, परीक्षक सुहास वरुणकर आदी उपस्थित होते.

देवरुखकर म्हणाल्या, शिवसेना गटातर्फे संपूर्ण राज्यात नवरात्र उत्सवानिमित्त जागर शिवशक्तीचा अभियान सुरू आहे. त्यानिमित्त फुगडीचे कार्यक्रम होत आहेत. महाराष्ट्र हे परंपरा व संस्कृतीचा मिलाफ असलेले राज्य आहे तर कोकण हे स्वर्ग आहे. कोकणातील माणसे निष्ठावंत आहेत. त्यामुळेच कोकण बाळासाहेबांच्या खर्‍याखुर्‍या शिवसेनेचा गड राहिला आहे. ज्यांनी-ज्यांनी गद्दारी केली त्यांना धूळ चारल्याशिवाय येथील जनता गप्प बसणार नाही. तीच शक्ती महिलांकडे देखील आहे. नवरात्र उत्सव होत असताना या राज्यात हा उत्सव साजरा करण्यासाठी महिला भगिनी सरकारच्या लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या आहेत का? हे सरकार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन त्यांची बोळवण करत आहे. मात्र आपण रोज या बहिणींवर अत्याचार झाल्याचे बघत आहोत. बहिंणींना पैसे नकोत तर त्यांना सुरक्षित ठेवणारे सरकार हवे.कोकणात गद्दार शिक्षणमंत्री यांचा मोठा पदभार आहे. त्यांच्या खात्यासाठी नोकर्‍या , प्रवेश याकरिता लाखो रुपये मोजले जातात. मात्र पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्यांना मोठे केले, मंत्रीपदे दिली, मानसन्मान दिला तो त्यांना राखता आला नाही, त्यामुळे या मतदारसंघातील जनतेशी कामांशी ते काय निष्ठावंत राहतील? असा सवाल देवरुखकर यांनी केला. या विधानसभा निवडणुकांमध्ये गद्दारांना धूळ चारायची आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून विधानभवनावर भगवा फडकवायचा आहे व मुख्यमंत्री पदावर उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा विराजमान करायचे आहे. त्यासाठी महिला शक्तीने योगदान द्यावे असे आवाहन सौ.देवरुखकर यांनी केले.

जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी, बाळासाहेबांनी महिलांना नारीशक्ती असे म्हटले आहे, हीच नारीशक्ती पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवत असते. कोकणात संगीत, कीर्तन, समाजप्रबोधन नाटक,लोककला यांचे सादरीकरण केले जाते त्यातून एक प्रकारचे समाजप्रबोधन होत असते. महिलांनी या कला जिवंत ठेवल्या. बहुतांशी लोककलांना राजाश्रय मिळाला नाही, त्यामुळे त्यांचे आयोजन करुन व्यासपीठ मिळवून देणे हा पक्षाचा हेतू आहे असे ते म्हणाले. जान्हवी सावंत म्हणाल्या, कोकणातील शेतीवाडी, घरदार, संसार सांभाळून लोककला जिवंत ठेवण्याचे काम महिला-भगिनी करत आहेत. गावागावांत उत्सवानिमित्त असे कार्यक्रम होत असतात. उबाठा शिवसेनेच्या महिला भगिनीही अशाच प्रकारे सक्षमपणे कार्यरत असून जेव्हा पन्नास खोके घेणारे पळाले तेव्हा शहरातील महिला आघाडी मी संपवली अशी आरोळी कोणीतरी ठोकली होती. मात्र पक्षाच्या निष्ठावंत असलेल्या महिला भगिनी कार्यकर्त्या हलल्या नाहीत. शहरातील तीच महिला आघाडी आजही तितक्याच सक्षमपणे आमच्या पाठीशी आहे असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news