

वेंगुर्ले: शिरोडा वेळागर समुद्रकिनारी दोन दिवसांपूर्वी (3 ऑक्टोबर) झालेल्या दुर्घटनेतील उर्वरित 2 मृतदेह आज रविवारी केळूस निवती व वेंगुर्ले नवाबाग समुद्रकिनारी आढळून आले आहेत. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे शुक्रवारी सायंकाळी कुडाळ, बेळगाव येथील पर्यटनासाठी आलेल्या परिवारातील 7 इसम समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यातील तिघांचे मृत्यू झाले होते. तर एक तरुणी व एक इसम बचावले होती. अन्य 4 जण समुद्रात बेपत्ता झाले होते. यापैकी दोघांचे मृतदेह शुक्रवारी रात्री व शनिवारी आढळून आले होते. तर उर्वरित दोघांचे मृतदेह आज रविवारी आढळून आले आहेत. यामधील इरफान मोहम्मद इसाक कित्तूर ,वर 36 वर्षे राहणार बेळगाव यांचा मृतदेह सकाळी 10.56 वाजता केळूस निवती येथील समुद्रात आढळून आला. तर जाकीर निसार मणियार, वय १३ वर्षे राहणार कुडाळ गुढीपूर त्याचे मृतदेह वेंगुर्ले नवाबाग येथील समुद्रामध्ये दुपारी 12 वाजता आढळून आला.
इरफान मोहम्मद इसाक कित्तूर यांचा मृतदेह निवती सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कांदळगावकर, सोनसुरकर, कदम, गोसावी, कुंभार, यांनी बाहेर काढण्यात आला. तर जाकीर निसार मणियार याचा मृतदेह वेंगुर्ले नवाबाग येथून समुद्रामध्ये सुमारे ६ किलोमीटर आतमधून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेखर दाभोलकर, पीएसआय योगेश राठोड, अंमलदार कदम, योगेश सराफदार, योगेश राऊळ, तांबे, जोसेफ, सरमळकर, देसाई, मांजरेकर, मनोज परुळेकर यांनी बोटीने बाहेर काढला.
या शोधमोहीम साठी मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या आदेशानव्ये मत्स्य विभागाचे ड्रोन वापरण्यात आले व महसूल प्रशासनाचे एचडीएम निकम व तहसीलदार ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार आदीचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरची शोध मोहीम पोलीस अधीक्षक मोहन दहिकर , अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम , उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेली आहे. दरम्यान मयत बाबत वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद प्रक्रिया होत असून पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.