

वेंगुर्ले ः वेंगुर्लेची सुकन्या शेफाली खांबकरला हिला पहिली ‘गल्फ सुपर शेफ’ होण्याचा बहुमान मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात तीन हजार स्पर्धकांमधून शेफाली खांबकरच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बिईंग मुस्कान आणि एसव्हीके यांच्या माध्यमातून दुबईमध्ये पहिल्या ‘गल्फ सुपर शेफ’ या अत्यंत मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धमध्ये युएई मधील नामवंत शेफनी सहभाग घेतला होता. यूएईच्या विविध भागातून तीन हजारहून अधिक शेफ यात सहभागी झाले होते. गेले काही दिवस सेलिब्रिटी शेफच्या उपस्थितीत विविध फेर्यांमधून पहिल्या सर्वोत्तम बारा शेफची निवड करण्यात आली. सलग तीन दिवस विविध फेर्यां मधून पहिल्या टप्यात आठ आणि नंतर अंतिम तीन शेफची निवड करण्यात आली. पंचतारांकित पदार्थांपासून स्ट्रीट फूड अशा विविध फेर्या जागतिक दर्जाच्या शेफकडून या स्पर्धेदरम्यान घेण्यात आल्या.
रविवारी 6 ऑक्टोबरला सायंकाळी दुबईमध्ये झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये शेफाली खांबकर निवडली गेली. या ग्रँड सोहळ्यात शेफाली खांबकर पहिली ‘गल्फ शेफ’ बनल्याची घोषणा करण्यात आली. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या हस्ते शेफाली हिला ‘गल्फ शेफ’ ट्रॉफी, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. गल्फमध्ये झालेल्या या पहिल्या भव्यदिव्य स्पर्धेत अव्वल ठरत एका कोकणकन्येने गल्फमधील या मानाच्या चषकावर आपले नाव कोरल्यामुळे तिचे अभिनंदन होत आहे. शेफाली ही वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आहे.
गल्फमधील ही मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना शेफालीने माझ्यासाठी ही फार मोठी अचिव्हमेंट असल्याचे सांगितले. स्वप्न सत्यात उतरले आहे असे वाटतेय.अर्थात या सगळ्यात माझे पती चेतन किन्नरकर, सासूबाई यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट होता. कोकणातील तुलनेने छोट्या पण सुंदर शहरातून मला सतत पाठबळ देणार्या माझ्या आई, वडील, बहिणीमुळे इथपर्यंत आले अशा भावना शेफालीने व्यक्त केल्या. रविवारी दुबईमध्ये शेफालीच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेफाली ही वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी संध्या खांबकर यांची कन्या आहे. शेफालीच्या या यशानंतर मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या या दोघांचेही विशेष अभिनंदन केले जात आहे.