

सावंतवाडी ः पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला हा देशावर अतिरेक्यांनी केलेला हल्ला आहे. त्याला केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन उत्तर द्यावे. सरकारच्या पाठीशी सर्व पक्षांनी उभे राहिले पाहिजे, त्यात कोणतेही राजकारण नाही. आम्ही या प्रश्नी सरकार सोबत आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते आंबोली ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार जी काही कारवाई करेल, त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, मात्र याबाबतच्या कोणत्याही निर्णयाचा भारतावर उलट परिणाम होणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. एखाद्याला त्याचा धर्म विचारून ठार मारणे हे अमानवी कृत्य असल्याचे सांगत त्यांनी या कृत्याच्या तीव्र निषेध केला.
पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधी म्हणून खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्या बैठकीत खा. सुळे यांनी, दहशतवादी हल्ला प्रकरणी सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. भारतीय विमानसेवेला पाकिस्ताने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने भारताला थोडा त्रास होईल,पण अश्या निर्बंधामुळे पाकिस्तानलाही एक संदेश जाईल, असे ते म्हणाले. सिंधुदुर्ग बॅक संचालक व्हिक्टर डॉन्टस, माजी मंत्री प्रवीण भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
ऊसाची नवी जात संशोधन करण्याचा प्रयत्न आंबोली येथे सुरु असून, या नव्या जातीची उंची 35 कांड्या पर्यंत वाढणार आहे. त्यातून जास्त साखर उत्पन्न मिळेल. त्यासाठी आढावा बैठक घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
हा भारताच्या आत्मसन्मानावर झालेला हल्ल्ला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे. ठोस कारवाईचा निर्णय घेतला असेल तर तो तडीस न्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने पाकिस्तानवर निर्बंध लादताना साधक-बाधक परिणामांचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.