Shaktipeeth Expressway : ‘शक्तिपीठ’ तीन महामार्गांना जोडणार

पर्यटन विकासाला गती मिळणार : आ. दीपक केसरकर
Deepak Kesarkar
मंत्री दीपक केसरकर.(File photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी ‘शक्तिपीठ महामार्ग' राज्यातील तीन प्रमुख महामार्गांना जोडणार असून, यामुळे कोकणातील पर्यटन विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर सावंतवाडी येथील आपल्या श्रीधर आपारमेंट निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

दोडामार्ग तालुक्यातील काही गावांचा 'इको सेन्सिटिव्ह झोन'मध्ये (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) समावेश झाला असून, त्यामुळे या भागात काही बंधने आली आहेत. या नियमांचे पालन होणे अत्यंत गरजेचे असून परिसरात वृक्षतोड होऊ नये यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज केसरकर यांनी व्यक्त केली. यासंदर्भात नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून आपण स्वतः विविध स्वयंसेवी संस्थांसोबत (NGOs) या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या रखडलेल्या आमसभांना पुन्हा सुरुवात होत आहे. ६ ऑगस्ट रोजी सावंतवाडी आणि ७ ऑगस्ट रोजी दोडामार्ग तालुक्याची आमसभा पार पडणार आहे, तर पुढील आठवड्यात वेंगुर्ले तालुक्याची आमसभा आयोजित केली जाईल. आमसभा हा पंचायत समितीच्या कामांचा आढावा घेण्याचा एक महत्त्वाचा मंच असून, या माध्यमातून तिन्ही तालुक्यांच्या सर्वांगीण व पर्यटन विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठीही त्यांनी एक खूशखबर दिली. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आणखी तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात आणखी काही गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news