Sindhudurg News : तिरोड्यातील त्या तीन वृद्ध भावंडांना मिळाला ‘माणुसकीचा आनंद’

​पणदूर 'संविता आश्रमा'त तीनही भावंडांचे पुनर्वसन
Sindhudurg News
​पणदूर 'संविता आश्रमा'त तीनही भावंडांचे पुनर्वसन
Published on
Updated on

कुडाळ : सावंतवाडी तालुक्यातील मौजे तिरोडा येथील अत्यंत हलाखीच्या आणि निराधार परिस्थितीत जीवन कंठणाऱ्या तीन वयोवृद्ध भावंडांच्या आयुष्यातील अंधार आता दूर झाला आहे. या असहाय भावंडांना कुडाळ-पणदूर येथील 'जीवन आनंद संस्था' संचलित 'संविता आश्रम'ने मायेचा हात देत त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनाची आणि सन्मानाने जगण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दशरथ अर्जुन काळुजी (६५), रत्नप्रभा अर्जुन काळुजी (६०) आणि विजय अर्जुन काळुजी (५५) ही तीन भावंडे गेल्या अनेक वर्षांपासून तिरोडा येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत होती. लहानपणी वडिलांचे छत्र हरपल्याने आईसह या तिघांचेही संगोपन मामाच्या गावी झाले. स्वतःचे हक्काचे घर नसल्याने आणि गरिबी पाचवीला पूजलेली असल्याने आयुष्यभर मजुरी करून त्यांनी उदरनिर्वाह केला. थोरले बंधू दशरथ काळूजी यांनी गोव्यात काही वर्षे रंगकाम तर लहान भाऊ विजय काळूजी यानेही मुंबईत वर्षभर काम केले. मात्र, परिस्थितीने पाठ फिरवल्याने अखेर ते गावी परतले.

​झोपडीतील 'तो' संघर्ष संपला!

​वाढते वय, आर्थिक दुर्बलता आणि कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्याने या तिन्ही भावंडांसमोर अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एका मोडकळीस आलेल्या झोपडीत ते अत्यंत दयनीय अवस्थेत राहत होते. या तीन वृद्धांची ही केविलवाणी अवस्था स्थानिक कार्यकर्ते संदेश सावंत यांच्या निदर्शनास आली. त्यांनी 'जीवन आनंद संस्थे'चे अध्यक्ष संदीप परब यांच्याशी संपर्क साधून या कुटुंबाला तातडीने मदत देण्याची विनंती केली.​परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवन आनंद संस्थेने या तिन्ही ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे पणदूर येथील 'संविता आश्रमात' दाखल केले. सध्या या आश्रमात त्यांना सुरक्षित निवारा, वेळच्या वेळी पौष्टिक भोजन, कपडे आणि आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news