Sindhudurg News : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा न्यायालयीन तिढा सुटला!

उच्च न्यायालयाकडून आरोग्य विभागाला ६ महिन्यांत पदे भरण्याचे आदेश
Sindhudurg News
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा न्यायालयीन तिढा सुटला!
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा आणि प्रलंबित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात 'अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग' यांच्या वतीने दाखल जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्या. नीरज धोते आणि न्या.शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी पार पडली. या निर्णयामुळे सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला असून अभिनव फाउंडेशन आणि आरोग्य कृती समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. ट्रामा केअरबाबत स्वतंत्र याचिका अभिनव फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठांमध्ये दाखल केली होती. मल्टीस्पेशालिटीच्या जागेबाबतची खंडपीठाकडे वेगळी याचिका होती.

दीर्घकाळापासून प्रलंबित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेच्या वादात राजघराण्यातील दोन्ही कुटुंबांमध्ये अखेर तडजोड झाली असून द्वितीय अपील यशस्वीरीत्या निकाली निघाले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. जागेचा न्यायालयीन तिढा संपल्याने आता रुग्णालयाच्या कामाला गती दिली जाईल, असे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी स्पष्ट केले.

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने रुग्णालयातील विविध वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला कडक निर्देश दिले: रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे येत्या ६ महिन्यांच्या आत भरण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. सध्या राज्यात १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यातून सावंतवाडीला तातडीने अधिकारी उपलब्ध करून दिले जातील, असे विभागाकडून सांगण्यात आले. ट्रामा केअर युनिटसाठी तातडीने अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. सचिन बळवंते यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयासाठी आवश्यक महत्त्वाची यंत्रसामुग्री पुढील ४ आठवड्यांत, तर शस्त्रक्रियेसाठी अत्यंत गरजेचे असलेले 'सी-आर्म मशिन' ८ आठवड्यांत खरेदी करण्याचे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत.

या जनहित याचिकेमध्ये अभिनव फाऊंडेशनच्या वतीने ॲड. महेश राऊळ, ॲड. मिहीर मोंडकर आणि ॲड. सुनील लवटे यांनी काम पाहिले, तर शासनाच्या वतीने ॲड. विकास माळी व ॲड. शिशिर हिरे यांनी बाजू मांडली. सुनावणीच्या वेळी अभिनव फाउंडेशनच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष एन. बी. रेडकर, तेजस परब आणि राहुल परब यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या न्यायालयीन निर्णयामुळे सावंतवाडी व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news