

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावर कणकवली आणि कुडाळ स्थानकांना नुकतेच नवीन रेल्वे थांबे जाहीर झाले असताना, जिल्ह्याचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सावंतवाडी स्थानकाकडे मात्र रेल्वे प्रशासनाने पुन्हा पाठ फिरवली आहे. या अन्यायाविरोधात आता सावंतवाडीकर एकवटले असून, आगामी नगरपालिका निवडणुकीत रेल्वे टर्मिनस हाच मुख्य मुद्दा असेल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.
सावंतवाडी हे तळकोकणातील आणि गोव्याच्या सीमेवरील महत्त्वाचे स्थानक असूनही येथे मूलभूत सोयींचा अभाव आहे. कोरोना काळात रद्द केलेले राजधानी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेसचे थांबे अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नाहीत.अनेक वर्षांपासून रखडलेले टर्मिनसचे काम आणि पाण्याचा प्रश्न (तिलारी धरण प्रस्ताव) तातडीने मार्गी लावा. कोरोना काळात काढलेले थांबे पुन्हा सुरू करा. मंगलोर एक्सप्रेस, वंदे भारत आणि निजामुद्दीन एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा द्या.
कणकवली-कुडाळला न्याय, मग सावंतवाडीवर अन्याय का? रखडलेले टर्मिनस काम, पाण्याची समस्या आणि काढून घेतलेले थांबे (राजधानी, गरीबरथ) त्वरित परत द्या! आम्हाला शक्तिपीठ नको, टर्मिनस हवे. येणार्या निवडणुकीत हाच आमचा मुख्य मुद्दा असेल! असा इशारा दिला आहे.
हा लढा यशस्वी करण्यासाठी केवळ मेसेज फॉरवर्ड करून चालणार नाही, तर खालील गोष्टींचा विचार करा असे आवाहन करण्यात आले आहे. सुजाण सावंतवाडीकर या बॅनरखाली हजारो सह्यांचे निवेदन थेट रेल्वे मंत्र्यांना आणि स्थानिक खासदारांना पाठवा.एका ठराविक दिवशी आणि वेळी सर्व सावंतवाडीकरांनी ट्विटरवर #SawantwadiTerminusNeedsAttention हा हॅशटॅग ट्रेंड करावा, असे आवाहन करणत आले आहे.