

सावंतवाडी : तालुक्यातील एका काळेथर क्वारीवर सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण होत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आपल्या खाजगी हद्दीत प्रवेश का केला? असा सवाल करत संबंधित सामाजिक कार्यकर्त्यास जाब विचारल्याचे दिसत आहे. गाडीतील एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर दुसरा एक सामाजिक गाडी चालवताना दिसत आहे.
तालुक्यातील मुंबई -गोवा महामार्ग शेजारील एका गावात हा प्रकार झाल्याचे दिसत आहे. महसूल विभाग तपासणीसाठी या क्वारीवर गेले असताना दोन सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी गेल्याची माहिती मिळते. यावेळी आपल्या खाजगी हद्दीत तुम्ही का आलात ? असा सवाल करताना व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. तसेच दुसऱ्या व्हिडीओत गाडीतील एका व्यक्तीला काहीजण मारहाण करताना दिसून येत असून एक जण दगड उचलताना दिसत आहे. तर हा वाद सोडविताना नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी देखील व्हिहीओत दिसत आहे. याबाबत संबंधित सामाजिक कार्यकर्त्याकडून सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांकडून गांभीर्याने दखल न घेता अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी दोघा विरुद्ध मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.