Sindhudurg News : दिल्लीतील अमानुष लाठी हल्ल्याचा सावंतवाडीत तीव्र निषेध

नीट पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा भव्य शांतता मोर्चा
Sindhudurg News
दिल्लीतील अमानुष लाठी हल्ल्याचा सावंतवाडीत तीव्र निषेध
Published on
Updated on

सावंतवाडी : नीट (NEET) परीक्षेतील संतापजनक पेपरफुटी आणि या घटनेचा दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद सावंतवाडीत उमटले . या केंद्र सरकारच्या दडपशाहीचा आणि भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी सावंतवाडीत विद्यार्थ्यांचा भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला. ‘आम्ही भारतीय’ संस्था आणि स्थानिक विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या निषेध मोर्चात ॲड. संदीप निंबाळकर, तौसीफ आगा, डॉ. जयेंद्र परुळेकर, ॲड. अनिल केसरकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, डॉ जयेंद्र परुळेकर, प्रा. प्रवीण बांदेकर माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, सोहम पेडणेकर, राबिया आगा, महेक शहा, आशिया शहा, श्रुती पाटील, रूपाली पाटील, सुबोध जाधव, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक शब्बीर मणियार, गौरी बांदेकर, आसिफ करोल सावंतवाडी तालुका सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रमेश बोंद्रे  यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळसुलकर हायस्कूलपासून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने निघून गांधी चौकात पोहचला. मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि निष्काळजीपणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलक विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना तीव्र संताप आणि खंत व्यक्त केली. आमचे आई-वडील स्वतःचे सोन्याचे दागिने आणि जमिनी गहाण ठेवून आम्हाला शिकवतात. आम्ही दिवस-रात्र एक करून प्रामाणिकपणे अभ्यास करतो, परंतु शेवटी पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे आमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले जाते. आमच्या भविष्याशी चाललेला हा खेळ आता खपवून घेतला जाणार नाही, असा उद्वेग विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला. या शांततापूर्ण आंदोलनात सावंतवाडीतील सुजाण नागरिक, विविध क्षेत्रांतील संवेदनशील व्यक्ती आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news