Sawantwadi Fake Currency : सावंतवाडीतील राष्ट्रीयीकृत बँकेत बनावट नोटा

कोल्हापूर, मुंबईतील मिळून सहा संशयितांना अटक; सांगली-कोल्हापूर कनेक्शन उघड
Fake Notes Racket
बनावट नोटा FIle Photo
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरलेल्या रकमेमध्ये 200 रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्या आहेत. याप्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सांगली येथे बनावट नोटांच्या कारखान्याद्वारे छापण्यात आलेल्या त्या नोटा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सहा संशयितांना सांगली कारागृहातून ताब्यात घेतले. या बनावट नोटांची व्याप्ती कोकण, गोव्यापर्यंत पसरल्याची शक्यता सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केली.

सावंतवाडीतील राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये एका ग्राहकाने खात्यामध्ये जमा करण्यासाठी दोनशे रुपयांच्या बंडल स्वरूपात भरणा केला. यातील 8 नोटा बनावट असल्याचे कॅशियरच्या निदर्शनास आले. या नोटा कुठून आणल्या, अशी विचारणा केली असता त्यांनी चलनातून आल्याचे सांगितले. कॅशियरने ही बाब शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणली. व्यवस्थापकांनी तत्काळ पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सांगली कारागृहात याच आरोपाखाली जेरबंद असलेल्या सहा आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतले. यामध्ये सुप्रीत कडप्पा देसाई (22), राहुल राजाराम जाधव (33), इब्रार आदम इनामदार (44), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (40), संदीप बाळू कांबळे (38, सर्व रा. कोल्हापूर) आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे (38, रा. मालाड, मुंबई) यांचा समावेश आहे.

मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

या अटकेमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. या बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सांगली येथे सुरू होता. ऑक्टोबर 2025 मध्ये हा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त करून सहाही आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले होते. हे सहाही आरोपी सध्या सांगली कारागृहात शिक्षा भोगत होते, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news