

सावंतवाडी ः सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी भाजपाचे अॅड. अनिल निरवडेकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अजय गोंदावळे (शिंदे शिवसेना) यांच्यावर 12 विरूद्ध 7 मतांनी विजय मिळवला. राष्ट्रीय काँग्रेसचे तौकीर शेख व ठाकरे शिवसेनेचे देवेंद्र टेमकर हे दोन नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. या निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेची युती होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र तसे काही घडले नाही. स्वीकृत सदस्य पदी भाजपचे अॅड. सिद्धार्थ भांबुरे व शिंदे शिवसेनेच्या अॅड. नीता सावंत -कविटकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सावंतवाडी उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवारी सकाळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अॅड.अनिल निरवडेकर यांनी मुख्याधिकार्यांकडे अर्ज सुपूर्द केला होता. तर शिंदे शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज नगरसेवक संजू परब गटनेते बाबू कुडतरकर यांच्यासह सहकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत मुख्याधिकार्यांकडे सादर केला. छाननी प्रक्रियेत दोन्ही अर्ज वैध राहिल्याने व कुणीही माघार न घेतल्याने निवडणूक होणार हे निश्चित झाले. या मतदानात भाजपाची 11 मते आणि नगराध्यक्षाचे एक मत मिळून 12 मते अॅड. अनिल निरवडेकर यांना मिळाली तर 7 मते अजय गोंदावळे यांना मिळाली. त्यामुळे अनिल निरवडेकर यांची उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याचे नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांनी जाहीर केले.
उपनगराध्यक्ष अॅड.अनिल निरवडेकर यांना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नीलम नाईक, वीणा जाधव, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले यांची मिळून एकूण 12 तर शिवसेनेला नगरसेवक संजू परब, बाबू कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर,अॅड. सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक यांची मिळून एकूण 7 मते मिळाली. तर काँग्रेसचे तौकीर शेख व उबाठाचे देवेंद्र टेमकर तटस्थ राहिले.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी अॅड. अनिल निरवडेकर हे विजयी झाल्याचे घोषित केले. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी टाळ्या व बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. तर नगरपरिषद कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून भाजपच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. याच वेळी स्वीकृत सदस्य पदी भाजपचे अॅड. सिद्धार्थ भांबुरे व शिंदे शिवसेनेच्या अॅड. नीता सावंत -कविटकर यांची बिनविरोध निवड झाल्याचेही नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी जाहीर केले.
निवड जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे तसेच विनोद राऊळ यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर व स्वीकृत नगरसेवक अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांचे अभिनंदन केले. नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने देविदास आडारकर, वकील संघटनेच्या वतीने अॅड. निरवडेकर आणि अॅड. भांबुरे यांचे अभिनंदन करण्यात आले. उपनगराध्यक्ष निरवडेकर यांचे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नवनिर्वाचित नगरसेवक संजू परब व सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले. त्यानंतर भाजप मंडल शहर अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष निरवडेकर यांचे अभिनंदन केले. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले याही उपस्थित होत्या.
ही निवडणूक प्रक्रिया प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. जि. प. माजी सदस्य मायकल डिसोजा, मंदार कल्याणकर, राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख, ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र टेमकर यांनीही उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर व स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन केले.
दै. ‘पुढारी’ची बातमी तंतोतंत खरी
सुरुवातीपासूनच सावंतवाडी उपनगराध्यक्षपदी अॅड. अनिल निरवडेकर यांची निवड होणार असे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून अॅड. सिद्धार्थ भांबुरे व अॅड. नीता सावंत -कविटकर यांची वर्णी लागणार असल्याची शक्यताही व्यक्त केली होती. दै. पुढारीने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार तंतोतंत निवड झाली. या बातमीमध्ये महायुती होणार नाही असेही म्हटले होते. त्यानुसार उपनगराध्यक्ष निवडीसाठी महायुती झाली नाही. शिंदे शिवसेनेने विरोधात राहण्याचा निर्णय घेतला आणि निवड बिनविरोध होऊ दिली नाही.