

सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि तालुक्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सायंकाळी साडेतीनच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि अवघ्या काही मिनिटांत धुवाँधार पाऊस सुरू झाला. तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आणि वाहनधारकांना या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, बळीराजा मात्र मोठ्या चिंतेत सापडला आहे. सध्या तालुक्यात भात कापणीचा हंगाम ऐन ताणावर आला आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली असून काहींनी कापून ठेवलेले भात शेतातच पडून आहे. आज झालेल्या धुवाँधार पावसामुळे हे कापलेले भात पूर्णपणे भिजले असून, उभ्या पिकांची शेती पाण्यात आडवी झाली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भात शेतीमध्ये दाणा कमी भरला होता, ज्यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला होता. त्यातच आता परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने उभे पीक भिजून कुजण्याची व मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्यामुळे विहिरी, नदी आणि नाल्यांची पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे आगामी काळात तीव्र टंचाई व दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता परतीच्या पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यास मदत होणार असून दुष्काळाचे सावट दूर होईल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. एकीकडे पाणीटंचाईचा धोका टळणार असला, तरी ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान केले आहे.