

‘एक मूठ’ अभियानाची वैशिष्ट्ये
कोणीही मूठभर धान्य देऊनही या कार्यात सहभागी होऊ शकतो
जमा होणारे अन्नधान्य, वस्तू थेट गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवल्या जातात
संस्थेचे कार्य पारदर्शक; दान केलेल्या वस्तूंचा योग्य वापर
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ या संस्थेने एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अभियान सुरू केले आहे. संस्थेने ‘द्या एक मूठ अन्नधान्याचे दान, वाचवूया निराधारांचे प्राण’ या नावाने अन्नदान मोहीम हाती घेतली असून, गरजूंना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती संस्थेचे रवी जाधव यांनी दिली.
‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ ही संस्था नेहमीच गरजू आणि संकटात सापडलेल्या लोकांसाठी 24 तास कार्यरत असते. संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याला विविध अनाथ आश्रमांना तसेच शहरातील आणि ग्रामीण भागातील निराधार वृद्ध व आजारी व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक मदत पुरवली जाते. मात्र, समाजातील गरजू लोकांची संख्या मोठी असल्याने, त्यांच्यापर्यंत वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी अधिक सहकार्याची गरज आहे, असे जाधव यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना रवी जाधव म्हणाले, शासकीय धान्य दुकानांमधून केवळ गहू आणि तांदूळ मिळतात. इतर आवश्यक वस्तू जसे की तेल, डाळी, मसाले इत्यादी खरेदी करण्यासाठी निराधार लोकांकडे पुरेसे पैसे उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या वस्तू त्यांना पुरवते. संस्थेने या अभियानाला यशस्वी बनवण्यासाठी आणि जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उदार मनाने मदत करावी, असे आवाहन केले आहे.
अन्नदानासाठी इच्छुक व्यक्ती रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि समीरा खलील कडे संपर्क साधू शकतात. चला तर मग, या सामाजिक बांधिलकीच्या कार्यात सहभागी होऊया आणि एकत्रितपणे गरीब व निराधार लोकांचे जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या लहानशा मदतीनेही कोणाच्यातरी जीवनात मोठा बदल घडवता येऊ शकतो.
शासकीय धान्य दुकानांमधून गरिबांना गहू आणि तांदूळ मिळतात, हे खरे आहे. पण केवळ त्यावर त्यांचे भागत नाही. रोजच्या जेवणासाठी लागणारे तेल, डाळी, तिखट-मीठ, मसाले यांसारख्या वस्तू विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसे नसतात. अशावेळी त्यांचे पोट कसे भरणार? हा विचार आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हता. तुम्ही फक्त एक मूठ अन्नधान्य दान करा. तुमच्या या लहानशा मदतीतून एका कुटुंबाची चूल पेटवू शकतो.
रवी जाधव ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’