Amboli Ghat Car Accident | सावंतवाडीतील कुटुंबीयांची कार आंबोली घाटात कोसळली

Amboli Ghat Car Accident |
Amboli Ghat Car Accident | सावंतवाडीतील कुटुंबीयांची कार आंबोली घाटात कोसळली
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी-बाहेरचावाडा परिसरातील एका कुटुंबातील प्रवाशांची कार आंबोली घाटात कोसळली. चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या धबधब्याच्या दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कारमधील तिघांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

 हा अपघात बुधवारी रात्री ७.३० वा.च्या सुमारास घडला. अपघातावेळी कारमध्ये चालक शहबाज रखानजी (३५), अमन बेग (२२), नजीम सय्यद (३५) आणि अब्रार चौधरी (२५) हे प्रवास करत होते. घाटातून जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट दरीत पलटी झाली. घाटात उपस्थित प्रवासी आणि पर्यटकांनी कार दरीत कोसळताना पाहिली आणि त्यांनी तत्काळ धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढण्यास मदत केली. याबाबतची प्राथमिक माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली.

हा अपघात घडला त्याचवेळी कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने येत असलेले माजगाव येथील संदीप कोटकर यांनी गाडी थांबवून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु नेटवर्कअभावी कॉल लागू शकला नाही. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला, मात्र ते शासकीय कामासाठी मुंबई येथे असल्याचे समजले. वेळ न दवडता संदीप कोटकर यांनी स्वतः आंबोली पोलिस चेक पोस्ट गाठले आणि तिथल्या पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती दिली.

पोलिस प्रशासनाकडून तत्काळ मदतकार्य

माहिती मिळताच आंबोली पोलिस चेक पोस्टवरील पोलिस कर्मचारी रामदास जाधव व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत कोसळलेल्या कारमधील जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका युवतीलाही किरकोळ दुखापत झाली असून, सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा मात्र चक्काचूर झाला. घटनास्थळी पोलिसांचे मदतकार्य आणि पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news