

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीर या मार्गावरील नाल्याचे बांधकाम करून तो बंदिस्त करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाकडून या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे परिसरातील सांडपाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या नाल्याची दुरवस्था आणि त्यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न लक्षात घेऊन युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आ.दीपक केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या कामाची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने निधीची तरतूद केली. या कामामुळे परिसरातील नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नाला बंदिस्त झाल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित वाट मिळणार आहे. दुचाकी पार्किंगसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होईल, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. उघड्या नाल्यातील सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव थांबणार आहे.
नागरिकांकडून समाधान
मच्छी मार्केट आणि सालईवाडा परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. अखेर काम सुरू झाल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. दीपक केसरकर आणि नगरसेवक देव्या सूर्याजी यांचे आभार मानले आहेत.