

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बीएसएनएलच्या कोलमडलेल्या सेवेबाबत माजी खा. विनायक राऊत यांनी बीएसएनएलच्या अधिकार्यांना जाब विचारला. खासगी मोबाईल कंपन्यांना मदत करण्यासाठी बीएसएनएलचे अधिकारी जाणीवपूर्वक सेवा सुधारत नसल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या दिवसांत सेवा सुधारली नाही, तर दूरसंचार कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला.
सोमवारी यासंदर्भात विनायक राऊत यांनी बीएसएनएलच्या जिल्हा प्रबंधकांसह अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गावागावातील बीएसएनएल टॉवर आणि तेथील समस्यांबाबत अधिकार्यांना जाब विचारला. ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश राऊळ, तालुका प्रमुख मायकल डिसोझा, रमेश गावकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांतील कोलमडलेल्या बीएसएनएल सेवेबाबत विनायक राऊत यांनी जिल्हा प्रबंधक रविकिरण जुन्नू यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. खाजगी मोबाईल कंपन्यांची टार्गेट पूर्ण करण्यात बीएसएनएलच्या अधिकार्यांचा हात असल्याने जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा सुधारत नसल्याचा आरोप करण्यात आला. सावंतवाडी मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलमडलेल्या बीएसएनएल नेटवर्क बाबत आणि अन्य विविध समस्यांबाबत श्री. राऊत यांनी श्री. जुन्नू यांच्याशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी गावागावातील बीएसएनएल टॉवर आणि तेथील समस्यांनाबत अधिकार्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, टेबल ला तालुकाप्रमुख यशवंत तालुकाप्रमुख संजय गवस,सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गंवडळकर, रमेश गावकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,उपसरपंच महेश गावडे, माजी सरपंच सुनील गावडे, रमेश गावकर, मंदार शिरसाट योगेश धुरी विनोद ठाकूर, सागर नाणोसकर, उमेश नाईक, अवी धातोंडकर, विजय देसाई, मिलिंद नाईक, लक्ष्मण आयनोडकर, संदेश वरक आदी उपस्थित होते.
देवगड तालुक्यातील दाभोळ गावात उभारलेला टॉवर अनेक वर्षे बंद आहे, सोनुर्ली येथील टॉवर विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर बंद पडतो, वायंगणी-हरिचरणगिरी टॉवर बाबत येथील सरपंच यांनी उपोषण करून सुद्धा अद्याप मोबाईल टॉवर कार्यान्वीत केलेला नाही, आदी समस्या मांडत आठ दिवसात हे टॉवर सुरू न झाल्यास ग्रामस्थांना घेऊन दूरसंचार कार्यालयावर धडक देऊ, असा असा इशारा श्री. राऊत यांनी दिला.
दोडामार्ग तालुक्यात हत्तींचे संकट मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी हत्तीकडून मनुष्यहानी झाली आहे. हत्ती ज्या ठिकाणी येतात, तेथील लोकेशन समजण्याकरता वनविभागाकडून ग्रामस्थांना मेसेज दिला जातो. मात्र नेटवर्क अभावी बर्याचदा असे मेसेज ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात बीएसएनएलची मोबाईल सेवा अखंडित ठेवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन विनायक राऊत यांनी दूरसंचार प्रबंधकांना केले.