

सावंतवाडी : सावंतवाडी- जिमखाना परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 13 हजार 250 रुपये रोख रक्कम, 3 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी पहाटे 4 वा. केली.
गुप्त माहितीनुसार हेमंत शामराव रंकाळे (वय 35, रा. न्यू खासकीलवाडा, सावंतवाडी) हा रोहन लहू पाटील (22, रा. जिमखाना सावंतवाडी) आणि पांडू बापू पवार (55, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ला) यांना सोबत घेऊन होळीचा खुंट, पांगम गल्ली येथील एका उघड्या शेडमध्ये जुगार खेळवत होता. सावंतवाडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी, प्लास्टिक कागदाच्या आडोशाखाली ‘अंदर-बहार’ जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तर एकजण पळून गेला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पीएसआय प्रमोद पाटील, माधुरी मुळीक, शिगांडे, पो. कॉ. पाटील आणि चालक चव्हाण यांच्या पथकाने केली.