

कणकवली ः प्रतिक्विंटल 2300 रु. असलेल्या भाताच्या आधारभूत किंमतीत आता केवळ 69 रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र या आधारभूत किंमतीतून भात शेतीचा उत्पादन खर्च देखील भागत नाही. त्यामुळे भाताच्या आधारभूत किंमतीत केलेली वाढ म्हणजे शेतकर्यांचा सन्मान नसून मोदी सरकारकडून शेतकर्यांच्या सन्मानाची चेष्टा करण्यात आल्याची टीका सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सतीश सावंत यांनी म्हटले आहे की, शेतमजूर मिळत नसल्याने बदलत्या काळानुसार कोकणातील शेतकर्यांना शेत नांगरणी, भात लावणी, भात कापणीची कामे कृषी यंत्रांद्वारे करावी लागत आहेत. कृषी यंत्रासाठी लागणार्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. भात बियाण्यांचे दर, खतांचे दर दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे भात पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी, पूरस्थिती, करपा रोग यामुळे भात शेतीचे दरवर्षी नुकसान होत असते.
यावर्षी तर हंगामाआधीच मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेत जमिनीत ओलावा वाढून भात बियाणे पूर्ण क्षमतेने उगवेल कि नाही याची शंका आहे. असे असताना मोदी सरकारने भात पिकाची किमान आधारभूत किंमत वाढविताना त्यात केवळ 69 रुपयांची वाढ करून मोठा गाजावाजा केला. मात्र एकीकडे भात पिकाच्या किंमतीत तुटपुंजी वाढ करण्यात आली तर दुसरीकडे भात शेतीला लागणार्या खतांच्या किंमती मात्र दुप्पटीने वाढविल्या आहेत. ही शेतकर्यांची चेष्टाच असल्याचे सतीश सावंत यांनी म्हटले आहे.