

सावंतवाडी : सावंतवाडी पालिकेच्या कारिवडे येथील कचरा डेपोची दुरवस्था आणि तिथे पसरलेले घाणीचे साम्राज्य पाहून नगरसेवक संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बुधवारी आपल्या सहकारी नगरसेवकांसह त्यांनी या डेपोची प्रत्यक्ष पाहणी करत स्पॉट पंचनामा केला. कचरा डेपोच्या या भीषण अवस्थेला पालिकेचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
कचरा डेपोतील परिस्थिती मांडताना संजू परब म्हणाले, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील मशिनी बंद पडल्या आहेत, कचरा साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, अशा अत्यंत खराब परिस्थितीत काम करणार्या कर्मचार्यांना मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. भविष्यात या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही, इतकी बिकट अवस्था झाली आहे.
पालकमंत्र्यांकडे 25 एकर जागेची मागणी
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे शहर परिसरात, जिथे स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही अशी 25 एकर जागा कचरा डेपोसाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून द्यावी, अशी मागणी केली असल्याचे परब यांनी सांगितले. ही जागा मिळाल्यास कचर्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौर्यावेळी संजू परब यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी आदी उपस्थित होते. या स्पॉट पंचनाम्यामुळे सावंतवाडी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील कचरा प्रश्नावरून सुरू झालेला वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी भाजप नगराध्यक्षांना टोला
संजू परब यांनी यावेळी न. प. चे नूतन सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला. ‘आम्ही सूत्रे हातात घेतल्यानंतर कचरा डेपोवर आलो आहोत, गार्डनमध्ये नाही, अशा खोचक शब्दात त्यांनी नाव न घेता नगराध्यक्ष व भाजप नगरसेवकांना टोला लगावला. आम्ही केवळ पाहणी करण्यासाठी नाही, तर जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी मैदानात उतरलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.