Sangli News| ‘आधार’च्या अटीने शिक्षक अतिरिक्त होणार?

प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांना संचमान्यतेत ग्राह्य धरण्याची मागणी
Teachers News |
‘आधार’च्या अटीने शिक्षक अतिरिक्त होणार? File Photo
Published on: 
Updated on: 

आष्पाक आत्तार

वारणावती : राज्यातील शाळांची संचमान्यता ३० सप्टेंबरच्या विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे केली जाते. मात्र, यू-डायस अथवा सरल प्रणालीमध्ये आधार प्रमाणिकरण असलेल्या विद्यार्थ्यांनाच संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जात असल्याने प्रत्यक्ष शाळेत नियमित उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ऑनलाईन नोंदीत कमी होत आहे. परिणामी विद्यार्थी शाळेत असूनही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , काही विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्याप काढलेले नाही. कौटुंबिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांचा अभाव किंवा अन्य कारणांमुळे आधार नोंदणीची प्रक्रिया रखडली आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे व्हॅलिडेशन होत नाही. हे विद्यार्थी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून शिक्षण घेत असतानाही केवळ आधार व्हॅलिड नसल्याने संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जात नसल्याची स्थिती आहे.

विशेषतः आश्रमशाळांमध्ये भटक्या-विमुक्त समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कुटुंबांकडे आधारकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे उपलब्ध नसल्याने आधार नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच संबंधित शाळांच्या संचमान्यतेवर परिणाम होत आहे.

संचमान्यतेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने राज्यातील शाळांमध्ये आधार काढणे व व्हॅलिडेशन पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः आधार केंद्रावर घेऊन जात आहेत. दरम्यान, केवळ आधार व्हॅलिडेशन हा संचमान्यतेचा एकमेव निकष न ठेवता प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करावी.

शिक्षक संघटनांच्या प्रमुख मागण्या...

प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पडताळणी करावी.

केवळ आधार व्हॅलिडेशन हा संचमान्यतेचा एकमेव निकष ठेवू नये.

जन्म दाखला, प्रवेश नोंदवही, उपस्थिती नोंद आदी कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांची पडताळणी करावी.

आधार असून तांत्रिक कारणामुळे व्हॅलिडेशन न झालेल्या विद्यार्थ्यांना संचमान्यतेत ग्राह्य धरावे.

आधार नसलेल्या मात्र नियमित शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी.

३० सप्टेंबरपूर्वी याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात

शासनाने प्रत्यक्ष पाहणी, पडताळणी करावी

याबाबत स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार म्हणाले, आश्रमशाळांमध्ये भटक्या-विमुक्त समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कुटुंबांकडे आधारकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने आधार नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. केवळ आधारकार्ड उपलब्ध नसल्यामुळे हे विद्यार्थी पट निश्चिती व संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जात नाहीत, त्याचा परिणाम शाळांच्या संच मान्यतेवर होऊन अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. शासन व प्रशासनाने आधारअभावी अपात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाहणी व पडताळणी करावी. विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे आढळल्यास त्यांना ग्राह्य धरावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news