

कणकवली ः कणकवली शहरातील सुरू असलेल्या विकासकामांना कोणताही अडथळा न आणता ती जलदगतीने, नियोजनबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. शनिवारी त्यांनी गांगो मंदिर ते रवळनाथ मंदिर रिंगरोडअंतर्गत सुरू असलेल्या गटार, रस्ता व अन्य अपूर्ण कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरअभियंता सचिन नेरकर, ठेकेदार जावेद शेख, तेजस राणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गटारांची कामे दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपात करावीत, अशा स्पष्ट सूचना श्री. पारकर यांनी ठेकेदारांना दिल्या. शहरातील सांडपाण्याचे योग्य नियोजन करून पावसाळ्यातील समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. धुरी घर ते सुतारवाडी रस्ता डी.पी. प्लॅनअंतर्गत मंजूर असून धुरी यांच्या घरापर्यंत खडीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम भूसंपादनामुळे रखडल्याची माहिती अभियंता सचिन नेरकर यांनी दिली.
रवळनाथ मंदिरासमोरील रिंगरोडवरील वळण योग्य पद्धतीने न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याची बाब सहदेव बागवे यांनी निदर्शनास आणून दिली. अपघात टाळण्यासाठी हे वळण सरळ करण्याची मागणी त्यांनी नगराध्यक्षांकडे केली. हिंद छात्रालयासमोरील रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी रस्ता 12 मीटर रुंदीचा करण्याबाबत नगराध्यक्षांनी अभियंता नेरकर यांच्याशी चर्चा केली. रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत दिलीप साटम यांच्याशीही चर्चा करण्यात आली.
हिंद छात्रालय ते गांगो मंदिरदरम्यान असलेल्या ट्रान्सफॉर्मर, गटार व फूटपाथची कामे करताना रस्त्यालगतच्या दुकानदारांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही नगराध्यक्षांनी दिल्या. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर असलेले विद्युत पोल हटवणे, वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवणे यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत शहरातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेण्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असून नागरिकांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत विकासकामे पूर्ण केली जातील, असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी यावेळी स्पष्ट केले.