

शब्दांकन : प्रफुल्ल जाधव, वैभववाडी
तथागत बुद्धांचे तत्त्वज्ञान अहिंसेवर आणि करुणेवर आधारित असले तरी ते रूढी, परंपरा यावर खडा प्रहार करणारेही आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेतील विघातक रुढी-परंपरांना बुद्धांचे तत्त्वज्ञान तितक्याच जोरकसपणे छेद देते. याद़ृष्टीने गौतम बुद्ध यांना ‘क्रांतिकारी बुद्ध’ असे संबोधणे ही अतिशयोक्ती नसून ऐतिहासिक सत्य ठरते. कारण, त्यांच्या विचारांनी आणि कृतीने धार्मिक परिवर्तनच घडवले नाही, तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्षेत्रातही एक मोठी क्रांती घडवून आणली. त्यांनी शोषणमुक्त, समतेवर आधारित समाजाचा विचार मांडला, जो त्या काळात क्रांतिकारी ठरला. बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख शुद्ध पौर्णिमा. बौद्ध धर्मीयांसाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशीच तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे तीन महत्त्वाचे टप्पे घडले. या महत्त्वपूर्ण दिनी तथागतांचा जीवनप्रवास आणि त्यांनी दिलेल्या ‘सम्यक मार्गा’चा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
‘बुद्ध’ म्हणजेच ‘जागृत झालेला’, ‘सम्यक’ म्हणजे ‘सुसंगत, योग्य, संतुलित’. गौतम बुद्ध हे केवळ एक धार्मिक गुरू नव्हते, तर ते मानवजातीसाठी एक प्रकाशवाट दाखवणारे विचारवंत होते. त्यांनी मानवाच्या दु:खांवर उपाय शोधण्यासाठी आपले वैभव, कुटुंब, आणि राजसत्ता यांचा त्याग केला. त्यांचा जीवनप्रवास म्हणजेच सम्यकतेकडे नेणारा मार्ग आहे, ज्यात मध्यममार्ग, करुणा, मैत्री आणि आत्मशुद्धी यांचा समावेश आहे.
गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स. पूर्व 563 साली लुंबिनी (आजचे नेपाळ) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव महामाया असे होते. बुद्धांचे लौकिक नाव ‘सिद्धार्थ’ असे होते. वय 29 वर्षांचे असताना ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी केलेला गृहत्याग ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. या घटनेने सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले आणि जगास एक नवा विज्ञानवादी द़ृष्टिकोन मिळाला.
बुद्धांनी आपल्या पहिल्याच धर्मप्रवचनात ‘चार आर्य सत्य’ मांडली. हे तत्त्वज्ञान मानवी जीवनाच्या मुळात असलेल्या समस्यांचा उगम आणि त्यावरील उपाय स्पष्ट करते.
दु:ख - जीवनात दु:ख आहे. जन्म, रोग, मृत्यू, वियोग, अप्रीतिसंपर्क, इच्छित न मिळणे हे सर्व दु:खाचे प्रकार आहेत.
दु:खसमुदय - दु:खाचे मूळ कारण तृष्णा आहे. ही तृष्णा म्हणजे इच्छा, आसक्ती आणि लोलुपता.
दु:खनिरोध - तृष्णेचे निरसन म्हणजेच दु:खाचा नाश होतो.
दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा - दु:खाच्या नाशासाठी ‘आष्टांगिक मार्ग’ अवलंबावा लागतो.
बुद्धांनी सांगितलेला आष्टांगिक मार्ग म्हणजेच सम्यक जीवनशैलीचा मार्ग. हे आठ अंग म्हणजे:
सम्यक द़ृष्टि - जीवनाचे यथार्थ ज्ञान.
सम्यक संकल्प - योग्य विचार व निर्धार.
सम्यक वाणी - खोटी, कटु, निंदा करणारी भाषा टाळणे.
सम्यक कर्म - हिंसा, चोरी, दुराचार यापासून दूर राहणे.
सम्यक आजीविका - प्रामाणिक आणि अहिंसक जीवनोपाय.
सम्यक प्रयास - वाईट विचार दूर करून चांगले विचार वाढवणे.
सम्यक स्मृती - सजगता व आत्मनिरीक्षण.
सम्यक समाधी - ध्यानधारणा आणि मानसिक स्थैर्य.
बुद्धांनी अति-सुख आणि अति-तप यांना नाकारून ‘मध्यम मार्ग’ सांगितला. जीवनात तटस्थतेने, संतुलितपणे व संयमानं वागणे हेच खरे बुद्ध तत्त्वज्ञान आहे. शरीराला कष्ट देऊन आत्मज्ञान मिळत नाही, तसेच भोगविलासात गुरफटूनही समाधान मिळत नाही, असे बुद्ध सांगतात. सर्व प्राणी दुःख अनुभवतात म्हणून त्यांच्याशी करुणेने वागा, असा संदेश ते देतात.
बुद्धांचे तत्त्वज्ञान अहिंसेवर आणि करुणेवर आधारित असले तरी ते रूढी, परंपरा यावर खडा प्रहार करणारेही आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेतील विघातक रुढी - परंपरांना बुद्धांचे तत्त्वज्ञान तितक्याच जोरकसपणे छेद देते. याद़ृष्टीने गौतम बुद्ध यांना क्रांतिकारी बुद्ध असे संबोधणे ही अतिशयोक्ती नसून ऐतिहासिक सत्य ठरते. कारण त्यांच्या विचारांनी आणि कृतीने धार्मिक परिवर्तनच घडवले नाही, तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्षेत्रातही एक मोठी क्रांती घडवून आणली. त्यांनी शोषणमुक्त, समतेवर आधारित समाजाचा विचार मांडला, जो त्या काळात क्रांतिकारी ठरला.
बुद्ध काळात भारतीय समाज जातिव्यवस्थेने विभागलेला होता. तत्कालीन व्यवस्थेमध्ये जन्मावर आधारित श्रेष्ठता मानली जात होती. बुद्धांनी या व्यवस्थेला खुलेआम आव्हान दिले. त्यांनी जन्माधारित श्रेष्ठतेचा पूर्णतः निषेध केला.
तथागत बुद्धांनी स्त्रियांनाही भिक्खू संघात प्रवेशाची परवानगी दिली. त्या काळात स्त्री स्वातंत्र्याची ही क्रांतीच होती. अस्पृश्य समजल्या जाणार्या जातींनाही त्यांनी धम्मात स्थान दिले. बुद्धांनी यज्ञ, बलिदान, मंत्र या रूढींचा विरोध केला. त्यांनी असा धर्म सांगितला जो अनुभवसिद्ध होता, तर्कशुद्ध होता, प्रत्येकासाठी खुला होता. त्यांच्या धर्मात अंधश्रद्धेला स्थान नव्हते
बुद्धांनी आचारधर्मावर भर दिला. त्यांनी सांगितलेल्या पंचशील आणि आष्टांगिक मार्गाने व्यक्ती आणि समाजाच्या नैतिक उत्थानाचा मार्ग दिला. सत्य बोलणे, प्राणीहिंसा टाळणे, चोरी न करणे, संयम पाळणे, मादक पदार्थांचे सेवन न करणे या नीतीमूल्यांची अंमलबजावणी म्हणजे एक नैतिक क्रांतीच होती.
बुद्धांनी आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म या संकल्पनांवर वेगळा द़ृष्टिकोन मांडला. त्यांनी ‘अनात्मवाद’, ‘प्रतित्यसमुत्पाद’ यासारख्या संकल्पना मांडून मानवकेंद्रित तत्त्वज्ञान निर्माण केले. त्यांनी मानवाच्या उन्नतीसाठी विचारस्वातंत्र्य, विवेकबुद्धी, संशोधनशीलता यांचा आग्रह धरला.
बुद्धांची क्रांती ही रक्तपात किंवा हिंस्र बंड नव्हते. ती होती मनातली क्रांती, सम्यक विचारांची शांततामुलक क्रांती. तथागतांनी हिंसक समाजाला अहिंसेचा, विषमतेच्या व्यवस्थेला समतेचा आणि अंधश्रद्धेला विवेकाचा मार्ग दाखवला.
गौतम बुद्ध हे केवळ धम्मप्रवर्तक नव्हते, ते समाजक्रांतीचे महान प्रवर्तक होते. त्यांनी शोषण, विषमता, अंधश्रद्धा, जातीयता यांच्यावर आघात करत सम्यक, समतामूलक समाजाची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांना ‘सर्वांत मोठा क्रांतिकारक’ म्हटले आहे.
बुद्धांनी समतेवर आधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे मानवजातीच्या उद्धारासाठी आणि दु:खमुक्तीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी कोणत्याही ईश्वरसत्तेवर अवलंबून न राहता, मनुष्याने स्वतःच स्वतःच्या दु:खांपासून मुक्त व्हावे, असा मार्ग दाखवला. त्यांचे तत्त्वज्ञान हे अनुभवसिद्ध, व्यवहार्य व अत्यंत वैज्ञानिक स्वरूपाचे आहे. तथागत बुद्धांची शिकवण आजच्या काळातही अत्यंत सुसंगत वाटते, कारण ती मनुष्याला मानसिक शांतता, तटस्थता आणि समत्व देणारी आहे.
आजच्या ताणतणावाने भरलेल्या आणि भौतिकतेकडे झुकलेल्या जगात बुद्धांचा सम्यक मार्ग अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यांनी दिलेले विचार-करुणा, अहिंसा, समतेची भावना, मनोसंवाद - हे सामाजिक सलोख्यासाठीही उपयुक्त ठरतात. बुद्धांनी सांगितलेली ‘अत्त दीपो भव’ म्हणजेच स्वतःच स्वतःचा दीप बना ही संकल्पना आजच्या युवकांना आत्मनिर्भरतेकडे नेते.
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आपण केवळ भगवान बुद्धांचे जन्मस्मरण करून नव्हे, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करून त्यांना आपल्या जीवनात उतरवणे गरजेचे आहे. सम्यक बुद्धांचा जीवनप्रवास, त्यांची सम्यक द़ृष्टी आणि त्यांनी दाखवलेला मध्यम मार्ग हा मानवतेसाठी एक अनमोल ठेवा आहे.
जगभरात अनेक अनुयायी आणि राष्ट्रांनी बुद्धांच्या विचारांना स्वीकारले आहे आणि त्यामुळेच आजही बुद्धांचा प्रकाश जगभर पसरलेला आहे. त्यांच्या शिकवणुकीचा प्रसार आजच्या काळात अत्यंत गरजेचा आहे.