

वेंगुर्ले : कोकण किनारपट्टीवर मत्स्य प्रजननाचा पावसाळी हंगामातील तीन महिन्यांचा कालावधी मत्स्य प्रजननास पोषक मानला जातो. या कालावधीत मासेमारी बंदी असावी असे मत केंद्र शासनाचे होते. परंतु, दोन महिन्यांनंतर एक ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाला. तरीही प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांना गेले तीन महिने मासेमारी बंद ठेवावी लागली. नैसर्गिकद़ृष्ट्या पोषक वातावरणात मत्स्य प्रजनन झाल्यामुळे मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले, मालवण, देवगड व विजयदुर्ग या तालुक्यांतील समुद्र किनार्यावर जून व जुलै या पावसाळी कालावधीत मासेमारी बंद होती. जुलै अखेरपर्यंत असलेली मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी शासनाच्या विचाराधीन होती. मासेमारीच्या कालावधीत ऑगस्ट ते मे पर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छीमारांकडून मासेमारी केली जाते. गेले दहा महिने सातत्याने होणारी मासेमारी ही मत्स्य उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरत आहे.
कोकणात तीन महिने पावसाळी हंगाम असतो. या हंगामात मोठ्या प्रमाणात समुद्रात नैसर्गिक दृष्ट्या मत्स्य प्रजननाची प्रक्रिया सुरू असते. पण शासनाने आतापर्यंत जून व जुलै हे दोनच महिने मासेमारी बंदी कालावधी म्हणून जाहीर केले आहे. जुलैनंतर होणारी मासेमारी ऑगस्ट महिन्यात होणार्या मत्स्य प्रजनन अडथळा निर्माण करणारे ठरत असल्यामुळे मत्स्यबंदीचा कालावधी ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा मानस शासनाचा होता. परंतु यावर्षी जुलै अखेर नंतर एक ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात झाली.
केवळ आठ-दहा दिवस मासेमारी हंगाम चालला आणि प्रतिकूल हवामानामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन समुद्र धोकादायक बनला. त्यामुळे किनारपट्टीवरील मच्छीमाराने समुद्रात जाऊन मासेमारी करणे थांबवत आपल्या मच्छीमारी नौका सुरक्षित खाडीपत्रात नांगरून ठेवल्या आहेत. पावसाळी हंगामात समुद्रात होणारे मत्स्य प्रजनन मासेमारी कालावधीत समाधानकारक मत्स्य उत्पादन मिळण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे मत्स्य प्रजननात पावसाळ्यातील तीन महिन्याचा कालावधी मिळावा, त्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे. तशी मागणी त्यांनी केंद्रशासनाकडे केली होती. अरबी समुद्रातील योग्य कालावधीतील होणारे मत्स्य प्रजनन मत्स्य टंचाईला आळा घालू शकते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण, देवगड आणि वैभववाडी तालुक्याला किनार्यावर स्थानिक मच्छीमार आपला उदरनिर्वाह मच्छीमारी व्यवसायातून करताना दिसतात. या हंगामात 31 जुलैपर्यंत मच्छीमारी बंदी कालावधी ठरवण्यात आला. या कालावधीत बंदर विभाग आणि मत्स्य विभाग यांच्या सूचनाचे पालन येथील मच्छीमार करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक ऑगस्टपासून मच्छीमारी हंगामाला सुरुवात केली होती. मात्र यावेळी मच्छीमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे जोर धरत होती. पण, त्या मागणीला केंद्र शासनाने मान्यता न दिल्यामुळे एक ऑगस्ट पासून मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यात आली.
जुलैपासूनच हवामानात अनियमितता आल्यामुळे समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम जुलैपासून गेले महिनाभर समुद्र खवळलेला राहिलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांना मच्छीमारी बंद प्रतिकूल हवामानामुळे ठेवावी लागेली. मत्स्य प्रजननाचा समाधानकारक तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे किनारपट्टीवरील मत्स्य टंचाईचे सावट दूर होऊन त्याचा फायदा येथील आपला उदरनिर्वाह करणार्या मच्छीमारांना होणार आहे. त्यामुळे चालू मच्छीमारी हंगाम समाधानकारक जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.