

पालकमंत्री नितेश राणे व खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
गणेशोत्सवाची सर्वात मोठी भेट! तुमची कारही येणार रेल्वेने
कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या हजारो चाकरमान्यांसाठी या वर्षीचा प्रवास अधिक सुखकर आणि अविस्मरणीय ठरणार आहे. आता आपली लाडकी कार मुंबई-पुण्यातून थेट रेल्वेने सिंधुदुर्गात आणण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे! कोकण रेल्वेने सुरू केलेल्या बहुप्रतिक्षित रो-रो कार सेवेला तीव्र नाराजी, सातत्यपूर्ण संघर्ष आणि प्रभावी राजकीय पाठपुराव्यानंतर, अखेर सिंधुदुर्गातील नांदगाव रोड स्थानकावर थांबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर मिळालेल्या या गोड बातमीमुळे चाकरमान्यांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, या यशाचा जल्लोष प्रवासी संघर्ष समितीने कणकवली स्थानकात फटाके फोडून आणि पेढे वाटून केला.
कोकण रेल्वेने अवजड वाहनांसाठी यशस्वी ठरलेल्या रो-रो सेवेच्या धर्तीवर, कोलाड ते वेर्णा (गोवा) दरम्यान कारसाठी रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, या सेवेला कोकणातील महत्त्वपूर्ण जिल्हे असलेल्या रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गमध्ये थांबाच नसल्याने ही सुविधा कोकणवासियांसाठी असून अडचण, नसून खोळंबा अशी झाली होती. आपली कार थेट गोव्यात किंवा रायगडमध्ये उतरवून पुन्हा शेकडो किलोमीटरचा प्रवास करण्याच्या त्रासामुळे चाकरमान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या विरोधात माध्यमांनी आणि प्रवासी संघटनांनी जोरदार आवाज उठवला होता.
कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने ही गंभीर बाब पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने केंद्रीय रेल्वे प्रशासन आणि संबंधित मंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा केला. कोकणवासियांची गरज आणि भावना लक्षात घेऊन सिंधुदुर्गात थांबा देण्याची आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. अखेर या एकत्रित प्रयत्नांना यश आले आणि रेल्वे प्रशासनाने नांदगाव रोड येथे अतिरिक्त थांबा मंजूर केला.
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत प्रवासी संघर्ष समितीचे सुरेश सावंत आणि संतोष राणे म्हणाले, आम्ही रेल्वे प्रवाशांच्या प्रत्येक हक्कासाठी सातत्याने आंदोलन केले आहे. हा थांबा म्हणजे आमच्या संघर्षाचा आणि खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा विजय आहे. यामुळे हजारो चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे. यावेळी संजय मालंडकर यांच्यासह समितीचे अनेक सदस्य जल्लोषात सहभागी झाले होते.
आता चाकरमान्यांना आपली कार थेट नांदगाव स्थानकावर उतरवता आणि चढवता येणार आहे. यामुळे मुंबई-पुण्याहून गाडी चालवत येण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचणार आहे. शेकडो किलोमीटरच्या प्रवासातील इंधनाचा खर्च आणि प्रवासाचा वेळ वाचणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. रेल्वेने कार वाहतूक अधिक सुरक्षित आणि सोपी ठरणार असल्याने संपूर्ण कुटुंबाचा प्रवास आरामदायी होईल.कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या सेवेमुळे कार चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी प्रवाशांना पुरेसा वेळ मिळणार आहे.कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे केवळ एक थांबा मंजूर झाला नसून, चाकरमान्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या गरजेचा सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
- कोलाडहून दुपारी 3 वाजता सुटेल आणि रात्री 10 वाजता नांदगावला पोहोचेल. येथून मध्यरात्री 12 वाजता निघून सकाळी 6 वाजता वेर्ण्याला पोहोचेल.
- वेर्ण्याहून दुपारी 3 वाजता सुटेल आणि रात्री 8 वाजता नांदगावला पोहोचेल. येथून रात्री 10:30 वाजता निघून सकाळी 6 वाजता कोलाडला पोहोचेल.
कणकवली रेल्वेस्थानकावर फटाके वाजवून व पेढे भरवून जल्लोष करताना सुरेश सावंत, संतोष राणे, संजय मालंडकर आदी.