

गुहागर : कोकणात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता हळुहळू दुर्मीळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेलासाठी वापरल्या जाणार्या तिळाच्या झाडांची पूर्वी ग्रामीण भागात भात आणि नाचणीसोबत लागवड केली जात असे. तिळापासून घरगुती तेल काढून ते रोजच्या आहारात वापरले जायचे; मात्र आता वाढते औद्योगिकीकरण, बदलते हवामान, बाजारपेठेतील मागणीवरील परिणाम आदी बाबींमुळे भातशेतीला पूरक अशी तिळाची शेती बहुतांश भागातील शेतकर्यांनी थांबविली आहे.
शेतीच्या या प्रकाराचे जतन न झाल्यास हे पारंपरिक पीक काळाच्या ओघात नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिळाची शेती टिकवण्यासाठी स्थानिक प्रशासन, कृषी विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकर्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदतीतून तिळाच्या शेतीचे संवर्धन, ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि पारंपरिक शेतीचे संवर्धन करणे ही आता काळाची गरज बनली आहे. या पारंपरिक शेतीच्या संवर्धनासाठी शेतकरी संघटना, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितरित्या काम करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा काळाच्या ओघात तिळाचे पीक कोकणातून हद्दपार होण्याची भीती व्यक्त होत आहे.