

मालवण : महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे 8 ते 9 सागरी मैल समुद्रात अनधिकृतरीत्या एल.ई.डी. लाईटद्वारे मासेमारी करणार्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली.
या दोन्ही नौका जप्त करून त्या सर्जेकोट बंदरात आणण्यात आल्या आहेत. नौकेवरील एलईडी लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून ती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत.
16 एप्रिलच्या रात्री मालवण किल्ल्यासमोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर व मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी हे दांडी - मालवण समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील परवाना असलेल्या नौका हाजि जावेद नों. क्र.खछऊ-चक-4-चच-5843 व धच-मातिन-क-इस्माईल नों. क्र.- खछऊ-चक-4-चच-5409 या दोन एलईडी नौका मालवण किल्ल्यासमोर 8 ते 9 सागरी मैल अतंरावर मासेमारी करताना दिसून आल्या.
मत्स्यव्यवसाय अधिकार्यांनी बोटींजवळ जात तांडेलकडे मासेमारी परवान्याची मागणी केला असता दोन्ही नौकांकडे परवाने नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या दोन्ही नौका आतील साहित्य तसेच तांडेल व खलाश्यांसह ताब्यात घेण्यात आले.
अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, पोलिस कर्मचारी श्री. हरमलकर तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईकरण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर नौकेबाबत सुनावणी सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय अधिकारी श्री. मालवणकर यांनी दिली.
दोन्ही नौकांवर तांडेलसह एकूण 65 खलाशी आहेत, तर अंदाजे 7 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. सदर नौकांना 5 ते 6 लाख रु.दंड होण्याची शक्यता आहे.