तोफ धडाडली...गुलाल, फुले उधळली, ढोल-ताशांच्या गजरात आचऱ्यात रामजन्म सोहळा

रामेश्वर संस्थान येथे रामजन्मोत्सव सोहळा दिमाखात
Ramjanmatsava celebration was celebrated at Rameshwar Sansthan
तोफ धडाडली...गुलाल, फुले उधळली ढोल-ताशांच्या गजरात आचऱ्यात रामजन्म सोहळाFile Photo
Published on
Updated on

आचरा : उदय बापर्डेकर

सकाळच्या प्रहरी सहस्त्र किरणे घेऊन आलेल्या रवीराजाच्या सोबतीने कसबा आचरे गावांतील रयत ही नित्याची कामे करण्यात गढून गेली होती. सूर्य जसजसा डोईवर येऊ लागला तसतसा कसबा आचरे गावात लगबग वाढून जो तो इनामदार श्री देवरामेश्वर मंदिराकडे जाऊ लागला अन... इनामदार श्री देवरामेश्वर मंदिराचा सभामंडप भाविकांनी फुलून गेला होता. हरिदास बुवांचे कीर्तन रंगात आले होते. त्याचवेळी दुपारी १२.३५ च्या मुहूर्तावर रामजन्माची जय जय रघुवीर समर्थ अशी ललकारी होताच...तोफा दणाणल्या.... बंदूकीच्या फैरी आकाशात झाडल्या....मंगल वाध्ये वाजू लागली....नगरखान्यात नगारे-ताशे झडू लागले. आचरानगरीत रामनामाचा नाद नभी पुरता निनादत होता. रामजन्म होताच येथे इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागते. यावेळी संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. आचरानगरीत साजरा होणारा राम जन्मोत्सव सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी मोठ्या संख्येने हजारो संख्येने भाविक उपस्थित होते.

जिल्हयात रविवारी सर्वत्र रामनवमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमून गेला होता. मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थाच्या ललकारी बरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.

डोळ्यांचे पारणे फेडणारा उत्सव

इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आचरा पंचक्रोशी पूर्णपणे 12 दिवस रामनामात दंग झाली होती. भक्तांच्या गराड्यात आचऱ्यात सांब सदाशिव पुरता दंग झाला होता. इनामदार श्री देव रामेश्वराच्या पुरातन मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्यनारायण आल्याने उन्हाचे चटके बसत होते. तरीही भाविकांना उत्कंठा होती, ती रामजन्माची. रामेश्वर मंदिराच्या भव्य मंडपात रामदासी बुवांचे कीर्तन सुरू असताना रामजन्म होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत 'राम जन्मला गं सखी राम जन्मला जयघोष सुरू झाला.

वाद्यांच्या गजरात सजविलेल्या पाळण्यात चांदीची रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. रामजन्म प्रसंगी गुलाल, अक्षतांची उधळण झाली. या क्षणांची याची देही याची डोळा साक्षात अनुभूती हजारो भाविकांनी घेतली. रामनवमी उत्सव आचरा रामेश्वर संस्थानसह संपूर्ण जिल्हयात साजरा करण्यात आला. रामजन्मानंतर श्रीच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी श्रींची पंचारतीसह महालदार,चोपदार, छत्रचामर, अबदागीर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी रामनामाची गीते सादर करण्यात आली. गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा आज रामजन्माचा आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळ्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी सहभागी झाले होते.

रामनवमीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता गायक श्री. समीर अभ्यकर (ठाणे-मुंबई) संवादिनी- श्री. प्रसाद शेवडे, तबला साथ- श्री. रामकृष्ण करंबेळकर. यांचे गायन झाले. गायनात आचरावासिय मंत्र मुग्ध झाले होते.

भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

रामजन्मानंतर उपस्थित सर्व जनता रामेश्वर संस्थानने केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादाच्या पंगतीस जात-पात, धर्माचा विचार न करता, एकाच पंगतीत सर्वधर्मीय नागरिकांनी एकमेकांच्या शेजारी बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीचा आशीर्वाद व महाप्रसादाचे सेवन करून प्रत्येकजण जीवन सार्थक झाल्याच्या भावनेतून परतत असतो. सुरमयी संगीताच्या मेजवानीचा रामन्मानंतर सायंकाळी नागरिकांनी आनंद लुटला. उत्सव शांततेत पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा व आचरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

रामजन्म सोहळ्याला मालवण तहसीलदार यांची भेट

श्री देव रामेश्वर मंदिरात रामजन्मला मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांचा सोबत मंडळ अधिकारी अजय परब उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news