Swabhimani Protest : आंबा-काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा

राजू शेट्टी यांचा ‌‘चक्का जाम‌’चा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
Raju Shetti
Swabhimani Protest
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी : वातावरणातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात सरकारने 22 मार्चपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 23 मार्च रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाल्यानंतर व्यासपीठावर राजू शेट्टी यांचे भाषण सुरू असताना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आगमन झाले. शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करू, असे आश्वासन दिले.

आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित या मोर्चाची गुरुवारी सकाळी 11.30 वा. सुरुवात सिंधुदुर्गनगरी फाटा येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर हजारो शेतकरी मुंबई-गोवा महामार्गालगतच्या फाट्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने भर उन्हात पायी निघाले. जय जवान जय किसान, शेतकरी एकजूट संघटनेचा विजय असो, आंबा-काजुला हमीभाव नाही तर खुर्चा खाली करा, एक शिट्टी राजू शेट्टी अशा गगनभेदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. मोर्चा कार्यालयाजवळ पोहोचताच त्याचे रूपांतर भव्य सभेत झाले.

या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, उद्योजक एम. के. गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास गावडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गावडे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, जयप्रकाश चमणकर, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, अमरसेन सावंत, गणेश गावकर, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जयेंद्र परुळेकर, माजी आ. राजन तेली, राजन नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, अजिंक्य गावडे, राजन गजनवार, विश्वास कोरे, गिरीश बोर्डे, किरण टेंबुलकर, प्रशांत शिंदे, विशाल मांजरेकर, काका ढोके, गणेश वाळके यासह जिल्हयातील आंबा काजू शेतकरी तिन हजारोहून अधिक शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

सभेत बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. आजची ही लढाई कोणाचा पराभव किंवा विजय ठरवण्यासाठी नाही, तर शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. कोकणात इतिहासात पहिल्यांदाच अशी क्रांती घडत आहे आणि आपण सर्वजण तिचे साक्षीदार आहोत, असे त्यांनी सांगितले. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या जुलमी कायद्याविरोधात साबरमतीवरून दांडी यात्रा सुरू केली होती, याची आठवण करून देत शेट्टी म्हणाले, त्या वेळी फक्त 78 जण होते, पण आज या आंदोलनात सात ते आठ हजार शेतकरी उपस्थित आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कमी लेखू नये. पर्यावरणीय बदलामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान झाले असून त्यासाठी शेतकरी जबाबदार नाहीत, असे सांगत त्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत देण्याची मागणी केली. तसेच 2019 मध्ये सांगली-कोल्हापूर महापुरानंतर ज्या पद्धतीने कर्जमाफी व मदत देण्यात आली, तशीच मदत कोकणातील शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.आंबा उत्पादकांनी घेतलेली कर्जे 31 मार्चला थकीत होणार असल्याने विशेष बाब म्हणून कर्जमाफी द्यावी, तसेच कर्जमाफीच्या निकषात न बसणाऱ्या बागायतदारांना प्रत्येक कलमामागे 5 हजार रुपये किंवा हेक्टरला 5 लाख रुपये आणि काजू बागायतदारांना हेक्टरला 3 लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मांडली. याशिवाय विमा धोरणाचा आढावा घेण्यासाठी एनडीआरएफची टीम सिंधुदुर्गात पाठवावी आणि मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, असेही त्यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर कोकणात नव्या संघर्षाला तोंड फुटेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. शेट्टी यांनी बँका, व्यापारी आणि औषध दुकानदारांनाही इशारा देत शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे स्पष्ट केले. सरकारचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांकडून वसुली करू नका. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले की, सिंधुदुर्गात 50-60 वर्षांत असा संकटाचा काळ आला नव्हता. शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी स्वतः येथे आलो आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल सरकारकडे आला असून शेतकऱ्यांना चांगले पॅकेज देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले. राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक घेण्यात येईल आणि केंद्र सरकारकडून अधिक निधी मिळवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेतली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी आ. वैभव नाईक यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या वेदनेचा आक्रोश आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी आमदार राजन तेली, डॉ. जयेंद्र परुळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोर्चासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आक्रोश मोर्चाने सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांचा संताप सरकारपर्यंत पोहोचवला असून आता सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.. या मागण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी आणि अनुक्रमे हेक्टरी 5 लाख रुपये व हेक्टरी 3 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. खते, किटकनाशके व बुरशीनाशके पुरवणाऱ्या काही कंपन्यांकडून बोगस औषधे व खते मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस आणली गेल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत कृषी विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. देवगड येथे अद्ययावत आंबा संशोधन केंद्र स्थापन करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हवामान, रोगनियंत्रण व आधुनिक शेतीविषयक माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात यावे., आंबा व काजू या पिकांना हमीभाव जाहीर करण्यात यावा. उसाप्रमाणेच या पिकांनाही किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळेल व बाजारातील चढ-उतारापासून त्यांचे संरक्षण होईल अशा मागण्यांचे निवेदन आंदोलन स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत उपस्थित राहिलेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news